|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » घरपट्टीची 9 महिन्यांत 65 टक्के वसुली

घरपट्टीची 9 महिन्यांत 65 टक्के वसुली 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांची माहिती : वसुलीत वैभववाडी तालुका अव्वल

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

एप्रिल 2018 ते डिसेंबर 2018 या 9 महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ग्रामपंचायतींनी 65 टक्के घरपट्टी वसुली केली आहे. उर्वरित तीन महिन्यात 35 टक्के वसुली करावी लागणार आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी एकूण 19 कोटी 9 लाख 84 हजार रुपये एवढी मागणी आहे. त्यातील 12 कोटी 33 लाख 31 हजार एवढी वसुली झाली आहे. तर पाणीपट्टी वसुलीतही 72 टक्के काम झाले असून या दोन्ही वसुलीत वैभववाडी तालुका नंबर एक असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.

 जिल्हय़ात अलीकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे काम सर्व ग्रामपंचायतीकडून चांगले होत आहे. जिल्हय़ातील सर्व ग्रामपंचायती घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष घालत आहेत. घरपट्टी वसुलीत एप्रिल ते डिसेंबर 2018 या नऊ महिन्याच्या कालावधीत घरपट्टी वसुली 65 टक्के तर पाणीपट्टी वसुली 72 टक्के एवढे काम झाले आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षाची 1 कोटी 38 लाख 65 हजार रुपये थकबाकी आणि सन 2018-19 या आर्थिक वर्षाची 17 कोटी 71 लाख 19 हजार एवढी मागणी मिळून एकूण 19 कोटी 9 लाख 84 हजार एवढे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. या पैकी तब्बल 12 कोटी 33 लाख 31 हजार एवढी घरपट्टी वसुली म्हणजेच 65 टक्के एवढी घरपट्टी वसुली करण्यात आली आहे.

यात वैभववाडी तालुक्मयाने सर्वाधिक 75 टक्के वसुली केली आहे. तर सर्वात कमी म्हणजेच 50 टक्के एवढी वसुली सावंतवाडी तालुक्मयाची झाली आहे. तसेच पाणीपट्टी वसुलीमध्येही जिल्हा आघाडीवर आहे. 9 महिन्यांत 72 टक्के वसुली झाली आहे. 6 कोटी 84 लाख 67 हजार एवढी सन 2018-19 या आर्थिक वर्षांची एकूण मागणी आहे. यातील 4 कोटी 95 लाख 7 हजार रुपये एवढी वसुली झाली आहे. यात सर्वाधिक 99 टक्के एवढी वसुली वैभववाडी तालुक्मयाने केली आहे. तर दोडामार्ग तालुक्याने सर्वात कमी 68 टक्के पाणीपट्टी वसुलीचे काम केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.