|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही ; माजी मंत्री वसंत पुरकेंचे विधान

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही ; माजी मंत्री वसंत पुरकेंचे विधान 

ऑनलाईन टीम /नागपूर :

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते आणि माजी मंत्री वसंत पुरके यांनी केले. काँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना तुरुंगात टाकू, असे देखील पुरके म्हणाले. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेचा समाचार घेताना पुरके यांची जीभ घसरली.

केंद्र आणि राज्यातील सरकारविरोधात काँग्रेसने सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा विदर्भात सुरू झाला. यावेळी नागपूरमधील कामठी आणि रामटेकमध्ये काँग्रेसच्या सभा झाल्या. यामधून काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना वसंत पुरकेंनी मोदी आणि फडणवीसांवर बोलताना पातळी सोडली. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. ’काँग्रेस काही त्यांच्या बापाची मालमत्ता नाही,’ असे पुरके म्हणाले. विशेष म्हणजे याआधीच्या जनसंघर्ष यात्रेतील भाषणावेळीही पुरकेंनी असंच वादग्रस्त विधान केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पुरकेंनी त्यांच्या कुटुंबाबद्दल वादग्रस्त विधाने केली. ’शेकडो महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा बाबा राम रहिम मुख्यमंत्री फडणवीसांना अष्टपैलू वाटतो. त्यामुळे माझा फडणवीसांना एक सल्ला आहे. त्यांनी बाबा राम रहिमला त्यांच्या घरी घेऊन जावे.बाबा तुम्हाला एखादा पैलू दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असं पुरके म्हणाले. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपा सरकारवर सडकून टीका केली.