|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालकमंत्री देशमुख आणि गटनेते चंदनशिवेंमध्ये खडाजंगी

पालकमंत्री देशमुख आणि गटनेते चंदनशिवेंमध्ये खडाजंगी 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघामधील पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि महापालिकेतील बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे या दोघांमधील आमदारकीच्या वर्चस्वाचा अंतर्गत वाद शनिवारी पुन्हा नियोजन भवनामधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेच्या निधीवरून या दोघांवरून चांगलीच खंडाजंगी झाली. नगरपालिका, महापालिका निधीवरून नगरसेवक चंदनशिवे यांनी समाजकल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्याना धारेवर घरत, आपली भूमिका मांडली. नेहमीप्रमाणे पालकमंत्र्यानी संयमीपणे आपले उत्तर देत या विषयास बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चंदनशिवे चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी पालकमंत्र्यांच्या दिशेने शाब्दीक हल्ले सुरु केले. देशमुखांनीदेखील ‘हम किसीसे कम नही’ याचा प्रत्यय आणून देत चंदनशिवे यांच्यावर शब्दफेक केली.

 तथापि यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमधील वातावरण काही वेळ तणावाचे बनले होते. बैठकीत काही वेळ शांतता पसरल्याचे चित्र दिसले.

 शुक्रवारी, सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दुष्काळ, चारा प्रश्न, आरोग्य, शाळेच्या इमारती प्रश्न, पशुसंवर्धन, गरिबांना मोफत वीज देणे यासह विविध विषयावर डीपीसी बैठक चांगलीच गाजली. दरम्यान, पालकमंत्री देशमुख आणि नगरसेवक चंदनशिवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा डीपीसीच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाला.

 समाजकल्याण विभागाचा विषय जेव्हा निघाला तेव्हा बसपाचे नगरसेवक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेसंदर्भात दिलेली माहिती चूकीची असल्याचे सांगत महानगरपालिकेतील 25 कोटींचे कामे केवळ कागदावरच असल्याचे सांगितले. 17 डिसेंबर रोजी मंजूरी मिळालेल्या विषयास प्रशासन 10 जानेवारीपर्यंत गप्प का तसेच दीड वर्ष हा विषय प्रलंबित का ठेवला असा सवाल उपस्थित करीत 25 कोटी पैकी 9 कोटी रूपयेच खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले होते.

  शेवटी पालकमंत्री म्हणाले, 9 कोटी पैकी 2 कोटी हे तुमच्या वार्डातच मंजूर केले आहेत. आजपर्यंत जेवढे प्रस्ताव आले आहेत त्याला मंजूर दिले आहेत आणि उर्वरित प्रस्ताव मंजूर केले असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावर चंदनशिवे यांनी तसा कागद पाठवा असेही पालमंत्र्यांना सांगितले. उर्वरित प्रस्ताव पालकमंत्र्यांनीच नामंजूर केल्याचे स्पष्ट समज आनंद चंदनशिवे यांच्या चेहऱयावरून जाणवत होते. 

…तर समितीच्या बैठकीत पाय ठेवणार नाही

उत्तर विधानसभा मतदार संघातुन बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे हे आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान चंदनशिवे यांचे येथे उभे ठाकणे पालकमंत्री देशमुखांना अडचणीचे आहे. आमदारीकच्या  उमेदवारीवरून देशमुख हे चंदनशिवे यांच्याबाबतीत राजकारण करत असल्याचा  आरोप चंदनशिवे यांच्याकडून केला जातोय. त्यातुनच देशमुख व चंदनशिवे यांच्यामध्ये विविध कारणांवरून वाद होतच आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत एका विषयावरून दोघामध्ये खंडाजंगी पाहण्यास मिळाली. एका विषयावरून नगरसेवक चंदनशिवे म्हणाले, पालकमंत्री आणि माझ्यात मतभेद असतील पंरतु मतभेद आहेत म्हणून आपण काहीही बोलत नाही. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेची कामांची फाईल दीड वर्षापासून प्रलंबीतच आहे. या प्रकरणत मी खोटे बोलतोय हे जर सिध्द झाले तरी मी पुन्हा कधी डीपीसीच्या सभागृहात पाय ठेवणार नसल्याचे चंदनशिवे यांनी स्पष्ट केले. 

आमने – सामने येण्याला नियोजन समिती बैठक निमित्तच

विजयकुमार देशमुख आणि आनंद चंदनशिवे यांच्यामध्ये अंतर्गत कलह तसेच तु…तु.. मै.. मै… असे मागील अनेक दिवसापासून सुरु आहे. दरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक हे दोघांनाही आमने- सामने येण्याला जणू निमित्त घडत आहे. अलिकडच्या काळात जेवढय़ा काही जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झाल्या त्यामध्ये हे दोघे आमने- सामने आलेच. त्यामुळे देशमुख, चंदनशिवे  वाद  आणि जिल्हा नियोजन समिती बैठक हे जणू समीकरण झाल्याची चर्चा बैठकीवेळी  इतर उपस्थितांमध्ये रंगली होती.

Related posts: