|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फ्रान्सच्या राजधानीत स्फोट, 2 जणांचा मृत्यू

फ्रान्सच्या राजधानीत स्फोट, 2 जणांचा मृत्यू 

पॅरिस

 फ्रान्सची राजधानी पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. मध्य पॅरिसमधील एका बेकरीनजीक मोठा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या स्फोटामुळे बेकरीचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला आहे. तर 17 जण जखमी झाल्याचे समजते. स्फोटामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने परिसरातील इमारतींच्या काचांना तडे गेले आहेत. प्रारंभिक तपासात वायूगळती झाल्याची बाब समोर आली आहे.

आठवडय़ाचा अखेरचा दिवस असल्याने पॅरिसच्या रस्त्यांवर लोकांची गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळीच बेकरीनजीक स्फोटाचा आवाज ऐकू आला. पोलिसांनी स्फोटाची पुष्टी दिली असून मदत तसेच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एका इमारतीतून महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. परिसरात वास्तव्य करणाऱया लोकांना देखील सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

मागील काही वर्षांमध्ये फ्रान्सच्या अनेक शहरांना दहशतवादी हल्ल्यांना तोंड द्यावे लागले आहे. पॅरिस तसेच नीस शहरात झालेल्या स्फोटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता. पॅरिसच्या चार्ली हेब्दो या नियतकालिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची जागतिक स्तरावर निंदा करण्यात आली होती.