|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱयाची नोकरी नाही जाणार – उद्धव ठाकरे

संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱयाची नोकरी नाही जाणार – उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेस्टसंप चर्चेच्या मार्गाने मिटवण्यात येईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. बेस्ट कर्मचाऱयांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. या संपात सहभागी झालेल्या एकाही कर्मचाऱयाची नोकरी जाणार नाही, असे आश्वासन उद्धव यांनी दिले. बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प विलीन केला जावा, अशी कर्मचाऱयांची मागणी आहे. याबद्दलचा ठराव मंजूर झालेला आहे. सध्या बेस्ट उपक्रम तोट्यात सुरू आहे. हा तोटा कमी करण्याचा विचार आहे. बेस्ट ही सेवा असल्याने फायद्यात आणण्याचा तितका आग्रह नाही. मात्र ना नफा ना तोटा तत्त्वावर ही सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कमीत कमी तोट्यात बेस्ट उपक्रम चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी काही सुधारणादेखील सुचवल्या आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करण्यासह वेतन कराराचादेखील प्रश्न आहे. या सर्व मागण्यांबद्दल चर्चा सुरू आहे. मात्र बेस्ट कर्मचाऱयांनी अवाजवी मागण्या करू नयेत. आधीच बेस्ट प्रशासनाची तिजोरी रिकामी आहे. अवास्तव मागण्या केल्यास एक वेळ अशीही वेळ येईल की बेस्ट कर्मचाऱयांना पगारही देता येणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. संपावर गेलेल्या एकाही कर्मचाऱयाची नोकरी नाही जाणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.