|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 26/11 च्या गुन्हेगाराला भारतात आणण्याची तयारी

26/11 च्या गुन्हेगाराला भारतात आणण्याची तयारी 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेत 14 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या तहव्वूर राणा याचे भारताला प्रत्यार्पण केले जाण्याची दाट शक्यता आहे. भारत सरकार सध्या ट्रम्प प्रशासनाच्या ‘पूर्ण सहकार्या’सह पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिकाच्या प्रत्यार्पणाकरता आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करत आहे. डिसेंबर 2021 मध्ये राणाचा तुरुंगवास संपणार आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्यांचा कट रचल्याप्रकरणी राणाला 2009 मध्ये अटक करण्यात आली होती.

लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या नागरिकांसह सुमारे 166 जणांचा जीव घेतला होता. पोलिसांनी 9 दहशतवाद्यांना घटनास्थळीच कंठस्नान घातले होते तर जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाबला न्यायालयीन प्रक्रियेनंतर फासावर लटकविण्यात आले होते.

तहव्वूर राणाला 2013 मध्ये 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अमेरिकेच्या अधिकाऱयांनुसार डिसेंबर 2021 मध्ये त्याची सुटका होणार आहे. अमेरिकेतील शिक्षा पूर्ण झाल्यावर राणाला भारतात पाठविले जाण्याची प्रबळ शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भारतासमोर आता आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करणे तसेच गुंतागुंतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान आहे. भारतीय विदेश मंत्रालय, गृह मंत्रालय तसेच कायदा मंत्रालयाने यासाठी प्रयत्न चालविले आहेत. अमेरिकेचे विदेश मंत्रालय तसेच न्याय विभाग स्थानिक कायद्यानुसार प्रत्यार्पणाबद्दलचा निर्णय घेणार आहे. प्रत्यार्पण प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी भारताला काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.