|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुंभमेळय़ातील तंबूंना आग, जीवीतहानी टळली

कुंभमेळय़ातील तंबूंना आग, जीवीतहानी टळली 

उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांनी दिला भरपाईचा आदेश 

प्रयागराज / वृत्तसंस्था

येथील कुंभमेळय़ासाठी भाविकांची आणि विविध आखाडय़ांच्या अनुयायांची गर्दी जमू लागली असून सोमवारी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे काही तंबूंना आग लागण्याचा प्रकार घडला आहे. तथापि, अग्निशमन दलांनी त्वरीत कृती केल्याने तीन तासांमध्ये आग आटोक्यात आली. तसेच सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱयांना सावधानतेचा इशारा दिला असून आगीमुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्याची सूचना केली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या घटनेचे रूपांतर मोठय़ा दुर्घटनेत झाले नाही, असे काही प्रशासकीय अधिकाऱयांनी प्रतिपादन केले.

दिगंबर आखाडय़ाच्या तंबूला आग

या कुंभमेळय़ात सहभागी झालेल्या दिगंबर आखाडय़ाच्या तंबूत सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या आसपास सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे या तंबूला आग लागली. तंबूतील माणसे त्वरित बाहेर गेल्याने कोणीही जखमी झाले नाही. काही वेळातच ही आग आजूबाजूच्या तंबूंमध्ये पसरली. एकंदर 12 तंबू या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असे स्पष्ट करण्यात आले. आगीचे वृत्त मिळताच 10 मिनिटांच्या आत अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थानी पोहचल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी 2 तास लागले असे सांगण्यात आले.

सुरक्षा दक्षता चोख

ही अपवादात्मक घटना घडली असली तरी एकंदर सुरक्षा व्यवस्था सुसज्ज आहे. अर्धसैनिक दले, गृहरक्षक दले, राज्य सुरक्षा दले आणि इतर सुरक्षा यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली असून कोणतीही दुर्घटना घडू नये याची पूर्ण दक्षत घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

मंगळवारी प्रारंभ

या कुंभमेळय़ाला आज मंगळवारी अर्थात मकर संक्रांतीच्या दिनी प्रारंभ होत आहे. प्रथम पवित्र स्नान याच दिवशी आहे. मंगळवारी 30 लाखांहून अधिक भाविक गंगा स्नान करतील असे अनुमान आहे. हे कुंभपर्व 49 दिवस चालणार असून त्यात 12 कोटींहून अधिक भाविक सहभागी होतील असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.