|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान मोदींना कोटलर पुरस्कार घोषित

पंतप्रधान मोदींना कोटलर पुरस्कार घोषित 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथम फिलिप कोटलर अध्यक्षीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारताला उत्कृष्ट नेतृत्व दिल्यामुळे मोदींना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे या पुरस्काराच्या प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. हा पुरस्कार याच वर्षापासून सुरू झाला असून मोदी त्याचे प्रथम मानकरी ठरले आहेत.

अथक प्रयत्नांच्या माध्यमातून भारताची निस्वार्थ सेवा आणि समर्थ नेतृत्व देशाला प्रदान केल्याबद्दल मोदींचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. मोदींच्या नेतृत्वात भारताने संशोधन, तंत्रज्ञानविकास, मेक इन इंडिया, माहिती तंत्रज्ञान, लेखापालन, वित्तधोरण आदी क्षेत्रांमध्ये लक्षणीय विकास केला आहे. त्यामुळे भारत आज जगात एका शक्तीच्या स्वरूपात उभा राहिला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुण्s भारतीय समाजाला लाभ झाला असून त्यांचे वित्तधोरण सर्वसमावेश आहे, अशी प्रशंसा या प्रशस्तीपत्रात करण्यात आली आहे.

अनेक योजनांचा गौरव

मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या कार्यक्रमांमधून भारताने आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकास साधला आहे. भारत आता संपूर्ण जगात सर्वात आकर्षक गुंतवणूक क्षेत्र बनला असून उत्पादन आणि व्यापार क्षेत्रात त्याने उच्चस्थान मिळविले आहे, अशीही स्तुती प्रशस्तीपत्रात करण्यात आली आहे.

प्राध्यापक फिलिप कोटलर हे नॉर्थवेस्ट विद्यापीठाच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे विश्वमान्य प्राध्यापक आहेत. त्यांच्या नावे हा पुरस्कार यंदापासून देण्यात येणार आहे. त्यांचे प्रतिनिधी डॉ. जगदीश सेठ भारतात येऊन पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत.