|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला जोर

कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला जोर 

भाजपकडून हालचाली : काँग्रेसमधील तीन आमदार मुंबईत : युती सरकारला धोका

प्रतिनिधी/ बेंगळूर

मकर संक्रांतीनंतर राज्यातील निजद-काँग्रेस युती सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांनी केले होते. त्यामुळे केवळ राज्य राजकारणातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली होती. भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांना आपल्या जाळय़ात अडकविण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ राबविले आहे. काँग्रेसमधील तीन आमदार मुंबईत असून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यांच्यामार्फत आणखी काही आमदारांना हाताशी धरून कोणत्याही परिस्थितीत युती सरकार पाडण्याच्या हालचाली भाजप नेत्यांनी सुरू केल्या आहेत.

सध्या दिल्लीत असलेल्या राज्यातील सर्व भाजप आमदारांना पक्षश्रेष्ठींनी हरियाणामधील गुरुग्राम येथील रिसॉर्टमध्ये नेले आहे. येथूनच कर्नाटकातील युती सरकार पाडण्याच्या हालचाली करण्यात येणार आहेत. यापूर्वी भाजप आमदारांना मुंबईतील रिसॉर्टमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हरियाणा मुंबईपेक्षा अधिक सुरक्षित असल्याने हा निर्णय बदलण्यात आला. सोमवारी दुपारी नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये प्रमुख नेत्यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावून महत्त्वाच्या सूचना दिल्या.

भाजपकडे सध्या 104 आमदार आहेत. त्यांना सरकार स्थापनेसाठी आणखी 9 आमदारांचे पाठबळ हवे आहे. काँग्रेस आणि निजदमधील आणखी काही आमदारांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युतीमधील 14 असंतुष्ट आमदारांना भाजप नेत्यांना गळ टाकला आहे. त्यापैकी किती जण भाजपला पाठिंबा देतील हे पहावे लागेल.

काँग्रेस पक्षातील तीन आमदार रमेश जारकीहोळी, आनंदसिंग आणि बी. नागेंद्र हे तिघे भाजपच्या संपर्कात असल्याची कबुली मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्यामुळे राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधील आमदार रमेश जारकीहोळी, आनंदसिंग, बी. नागेंद्र, उमेश जाधव यांच्याबरोबरच शिवराम हेब्बार, बसवनगौडा दद्दल, देवेंद्र चव्हाण, गणेश, प्रतापगौडा पाटील, अमरेगौडा बय्यापूर, बी. सी. पाटील, आश्विन कुमार तसेच अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांच्याश संपर्क साधण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. यापैकी अनेक आमदारांनी पक्षातील वरिष्ठांशी संपर्क तोडला आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने निराश झालेले चिंचोळीचे आमदार डॉ. उमेश जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. चिंचोळी या राखीव मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांना गोदाम निगमचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यांनी या पदाचा पदभार अद्याप स्वीकारलेला नाही. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे प्रमुख भाजप नेत्यांची भेट घेतली होती. ते बेंगळूरला परतल्यानंतर काँग्रेस वरिष्ठांनी त्यांची समजूत काढली होती.

दरम्यान, आमदार आनंदसिंग यांनी आपण न्यायालयीन खटल्यामध्ये व्यग्र आहे. त्यामुळे आपल्याला मतदारसंघातील कामांकडे पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. आपण दिल्ली किंवा मुंबईला गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

अपक्ष आमदार सरकारचा पाठिंबा घेणार मागे?

सरकार स्थापनेवेळी पाठिंबा दिलेले राणेबेन्नूरचे आमदार आर. शंकर आणि मुळबागिलचे आमदार एच. नागेश यांनी देखील आपली भूमिका बदलली आहे. ते सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे सुत्रांकडून समजते. ते मंगळवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे सांगतील.

डी. के. शिवकुमारांना पाचारण

अधिकारापासून वंचित राहिल्यामुळे काँग्रेसमधील असंतुष्ट आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळताच काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पक्षातील आमदार भाजपच्या गळाला अडकू नयेत यासाठी मंत्री डी. के. शिवकुमार यांना पाचारण करण्यात आले आहे. युती सरकार स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता पुन्हा एकदा सरकार स्थिर ठेवण्यासाठी पक्षातील असंतुष्टांची समजूत काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

निजद-काँग्रेस आमदारांशी संपर्क नाही :येडियुराप्पा

नवी दिल्लीत असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांनी ऑपरेशन कमळचे वृत्त फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेजबाबदारपणे विधान केले आहे. आपण कोणत्याही काँग्रेस किंवा निजद आमदारांशी संपर्क साधलेला नाही. निजद नेत्यांनीच सरकार स्थिर ठेवण्यासाठी आपल्या पक्षातील आमदारांशी संपर्क साधला आहे, असा आरोप येडियुराप्पा यांनी केला आहे.

निजद आमदारांनाही गळ

काँग्रेस आमदारांपाठोपाठ निजदमधील आमदारांनाही भाजपने गळ घातल्याची चर्चा आहे. मंत्री एच. डी. रेवण्णा यांची हुकूमशाही आणि निगम-महामंडळांवर अध्यक्षपदे न मिळाल्याने निजदमधील असंतुष्ट आमदारांची माहिती मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही जणांशी चर्चा करून त्यांना आमिषे दाखविण्यात आल्याचे समजते.

‘बी अलर्ट’ रहा

भाजपने ऑपरेशन कमळ राबविल्याची माहिती मिळताच सतर्क झालेल्या राज्य काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी बेंगळूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये पक्षातील आमदारांनी बैठक बोलावून चर्चा केली. संबंधित जिल्हय़ातील पालकमंत्र्यांनी पक्षातील आमदार भाजपच्या वाटेवर जाणार नाही याची जबाबदारी उचलावी. भाजपच्या ऑपरेशन कमळची भीती असल्याने या आमदारांना सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ‘बी अलर्ट’ (भाजपपासून सतर्क) रहा अशी सूचना, युती सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी दिली आहे.