|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापुरातून 5 हजार ब्राम्हण मुंबईत ‘धरणे’ आंदोलनात सहभागी होणार

कोल्हापुरातून 5 हजार ब्राम्हण मुंबईत ‘धरणे’ आंदोलनात सहभागी होणार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ब्राम्हण समाजाच्या विविध 15 मागण्यांसाठी सकल ब्राम्हण समाजाने 22 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्हय़ातून 5 हजार जण सहभागी होतील. तसेच या आंदोलनाला 15 संघटनांनी पांठींबा दिला आहे.

ब्राम्हण समाजानेही आता आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू केला आहे. समाजाने समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, ब्राम्हण समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मंजूर आहे, पण समाजाचे सर्वेक्षण होऊन त्याचा लाभ मिळावा, ब्राम्हण, पुरोहितांना महिना 5 हजार रूपये मानधन मिळावे, समाजाची बदनामी रोखण्यासाठी कायदे करावेत, आयटी ऍक्टनुसार दाखल गुन्हे दखलपात्र व्हावेत, ब्राम्हण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हय़ात वसतीगृह व्हावे, केजी टू पीजी शिक्षण मोफत द्यावे, ब्राम्हण सेवकांना मिळालेल्या इनाम जमिनींची खासगी मालकी कायम करावी, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यावे, छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक तातडीने पूर्ण करावे, बाजीराव पेशव्यांवर शनिवारवाडय़ात युद्ध स्मारक तयार करावे, आदी मागण्या केल्या आहेत.

सकल ब्राम्हण समाजाने प्रलंबित मागण्यांसाठी  22 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. त्याच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हय़ातील 54 ब्राम्हण संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक रविवारी झाली. खरी कॉर्नर येथील श्री लक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत राज्य समन्वयक अंकीत काणे यांनी मार्गदर्शन केले. 15 ब्राम्हण संघटनांनी आंदोलनाला पाठींबा जाहीर केला. बैठकीत धरणे आंदोलनासाठी 5 हजार जण जातील, हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीला मंगल धाम, कऱहाडे ब्राम्हण संघ, ऋग्वेदीक ब्राम्हण संघ, जिल्हा ब्राम्हण पुरोहित संघ, करवीर निवासिनी पुरोहित संघ, चित्पावन संघ, ब्राम्हण जागृती सेवा संघ यांच्यासह 54 संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. स्वानंद कुलकर्णी यांनी स्वागत केले. अवधुत गोरंबेकर यांनी प्रास्ताविक केले. मयुर तांबे यांनी बैठकीची माहिती दिली. विशाल पुजारी यांनी आभार मानले. बैठक यशस्वी करण्यासाठी स्वप्नील मुळये, प्रशांत पुजारी, विशाल पुजारी, प्रसाद निगुडकर यांच्यासह सकल ब्राम्हण समाजाच्या पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले.