|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन 

काँग्रेसनिष्ठ हरपल्याची भावना : मान्यवरांकडून श्रद्धांजली

प्रतिनिधी/ शिराळा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव बापूसो देशमुख (84) यांचे सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. गेली काही वर्षे त्यांच्यावर डायलेसिस उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी शिराळा तालुक्यातील कोकरूड या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व कट्टर काँग्रेस मॅन अशी त्यांची ओळख होती. मंत्रीमंडळात गृह, सहकार, बांधकाम पाटबंधारे परिवहन यासह बहुतेक खात्यांचा त्यांनी मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. सांगली जिल्हय़ात गाजलेल्या खुजगाव चांदोली वादात त्यांनी वसंतदादांचे समर्थन केले होते. वसंतदादा, शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, मंत्रीमंडळात ते सहभागी होते. प्रशासकीय सेवेतून ते राजकारणात उतरले. पहिली सार्वत्रिक निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. पण, नंतर व आधीही काँग्रेस निष्ठ हा त्यांचा बाणा होता. शिराळा मतदारसंघाचे 1978 पासून सलग चारवेळा प्रतिनिधीत्व केले. विधान परिषदेवर त्यांनी दोनवेळा विजय प्राप्त केला. विधान परिषदेचे सभापती म्हणून सलग तीनवेळा बिनविरोध विजयी झाले होते. वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि संयमी नेते म्हणून राज्यभर व काँग्रेसमध्ये त्यांची ओळख होती.

वसंतदादांची राजकीय निवृत्ती, संन्यास यावेळी आणि राज्यात गाजलेल्या बारमाही-आठमाही पाणी वादात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. शिराळा तालुक्यात शेतीला पाणी आणि निनाई साखर कारखाना उभारण्यात ते आघाडीवर होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. कोयनेचा भूकंप नंतर शिराळा तालुक्यात सुरू झालेली भूकंपाची मालिका यासह अनेक प्रश्नांना व ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजनाना गती देण्यात त्यांचे योगदान होते. त्यांच्या पश्चात पुत्र सत्यजित देशमुख, कन्या डॉ. शिल्पा व पत्नी सरोजिनी असा परिवार आहे. गेली अनेक वर्षे ते मधुमेहाने आजारी होते. किडण्या कार्यक्षम नसल्याने त्यांना डायलेसिस करावे लागे. त्यांची निवासस्थानीच ही सोय होती. पण, गेली काही वर्षे त्यांना प्रकृती साथ देत नव्हती. गणेशचतुर्थी हा त्यांचा वाढदिवस कार्यकर्ते उत्साहाने साजरा करीत असत. त्यांची एकसष्टी व पंचाहत्तरी ही जनतेने साजरी केली होती. मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली तरी ते ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस विचाराचा पक्षाचा आधार म्हणून कार्यरत राहिले. काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा प्रकाशबापू पाटील, शिवाजीराव देशमुख आणि डॉ. पतंगराव कदम यांनी काँग्रेस सांगली जिल्हय़ात आणि महाराष्ट्रात पुन्हा खंबीर केली होती.

प्रकृती खालावल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज मंगळवारी कोकरूड येथे त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.