|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खिलारी बैलांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर

खिलारी बैलांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर 

खिलारी बैल जात नामशेष होण्याच्या मार्गावर

सुधीर जाधव/ सातारा

खिलार जातीच्या गाय-बैलांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वांत सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी खिलार जात काही दिवसांत नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 राज्यात बैलगाडा शर्यतीमुळे बैलांचे अतिशय चांगल्या पद्धतीने पालन-पोषण होते. शर्यतीच्या बैलांची विशेष काळजी घेतली जाते व शर्यतीच्या प्रेरणेतूनच अनेक वर्षे बैलांच्या खरेदी-विक्रीतून मोठय़ा प्रमाणात उलाढाल ग्रामीण अर्थव्यवस्थेत पाहावयास मिळत होती. काही नियम, अटी ठेवून व बैलांवर अत्याचार होणार नाहीत, असे नियम करून होणारी बैलगाडा शर्यत ही चांगली का वाईट याहीपेक्षा या शर्यतीच्या प्रेरणेतून लाखो गाय-बैल शेतकरी स्वखर्चाने सांभाळतात ही महत्त्वाची गोष्ट आहे. राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी कायदा केलेला असला, तरी या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिल्याने या कायद्याची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सध्या राज्याचा बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 

 राज्यात शर्यतबंदीचा फटका खिलारच्या संगोपनास बसल्याने या जनावरांची संख्या मागील काही वर्षांपासून लक्षणीय कमी झाली आहे. याबाबत खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुसेगाव (जि. सातारा) येथील बाजाराची 2006-2007 पासून 2015-16 ची आकडेवारी सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. ज्या पुसेगावच्या बाजारात 10 वर्षांपूर्वी 45 हजार खिलार जनावरे विक्रीस येत होती. त्या बाजारात चालू वर्षी (2018-19) किमान 1 हजार जनावरेसुद्धा विक्रीस आलेली नाहीत ही वस्तुस्थिती अतिशय भयावह आहे.

 घरात मल्ल व दारात वळू हे बिरुद अभिमानाने मिरवणारी अशी परंपरा असणारी खिलार बैलांची राज्यातील दिवसेंदिवस कमी होणारी संख्या ही एक धोक्याची घंटा आहे. राज्यात नुकताच घोडय़ांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (जि. नंदुरबार) येथे चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय सोयीसुविधांनीयुक्त बाजार म्हणून सारंगखेडाचे जगात नाव झाले. त्यासाठी आयोजकांनी कष्ट घेतले व राज्य सरकारने मोठे योगदान दिले. परंतु, नेमके हेच खिलारच्या बाबतीत होताना दिसत नाही.