|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोळंब – पाटणे येथील रस्त्याचे डांबरीकरण उखडण्याची पाळी

कोळंब – पाटणे येथील रस्त्याचे डांबरीकरण उखडण्याची पाळी 

प्रतिनिधी/ काणकोण

आपली रीतसर परवानगी न घेता आपल्या जागेतील रस्त्याचे डांबरीकरण केल्याचा दावा करून जमीनमालकाने दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कोळंब-पाटणे येथील रस्त्याचे डांबरीकरण उखडून टाकण्यात आले आहे. या प्रकरणी जमीनमालक किर्ल द सांतान रिट वाझ यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती. न्यायालयाने गोवा सरकार, सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता विभाग यांना दोषी ठरवत कारवाईचा आदेश दिला होता. मात्र स्थानिक लोकांचे हित पाहून अधिक ताणून न धरता केवळ रस्त्याच्या काही भागांतील डांबर उखडून काढण्यात आला आहे.

या कारवाईच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, वाहतूक पोलीस विभागाचे गौतम साळुंके यांच्यासहित डझनभर पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. न्यायालयाचे बेलिफ थेवू वेळीप यांनी न्यायालयाचा आदेश यावेळी वाचून दाखवला. तत्पूर्वी उपनगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई, माजी नगराध्यक्ष समीर देसाई, स्थानिक नगरसेवक मारूती कोमरपंत त्याचप्रमाणे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी जमीनमालक किर्ल वाझ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा न्यायालयाचा आदेश असल्यामुळे त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगून त्यांनी घटनास्थळी येण्याचे टाळले.

1977 साली डांबरीकरण

पाटणे, कोळंब हा भाग सध्या पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत असून या भागात हंगामी शॅक्स तसेच तंबू उभारण्यात आले आहेत. 1977 साली तत्कालिन नगर्से-पाळोळे पंचायतीने या रस्त्याची उभारणी करून डांबरीकरण केले होते. त्यावेळी असलेले पंच स्व. गोपाळ धुरी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र सर्व्हे क्र. 79/1 आणि 68/1 ही आपली वडिलोपार्जित जमीन असताना आपल्या परवानगीशिवाय रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याचा दावा करून जमीनमालकाने याचिका सादर केली होती. त्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे या ठिकाणी किर्ल वाझ यांच्यावतीने उपस्थित असलेल्या त्यांच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले. त्याचबरोबर हा रस्ता बंद करण्यात येणार नाही. पर्यायी रस्ता उभारल्यानंतर सध्याच्या रस्त्याचे काय करता येईल ते पाहिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण उखडण्यात आलेले आहे त्या भागात एकूण 16 घरे असून बहुतेक सर्वच घरे किर्ल वाझ यांच्या मालकीच्या जमिनीत आहेत. त्या ठिकाणी काणकोण पालिकेने सुलभ शौचालय योजनेतून शौचालये उभारलेली आहेत. त्या शौचालयांवर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडण्यात येणार असल्याची खबर मिळताच वाडय़ावरील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार जेथील डांबर उखडण्यात आलेला आहे त्या रस्त्याच्या बाजूला जमीनमालकाचे नारळाचे कोठार आहे आणि सदर रस्त्यावरून त्यांनाही येणे-जाणे करावे लागत आहे. त्यामुळे पुढेमागे यात बदल देखील होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.

Related posts: