|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजेश घोडगेंना बॅट उंचावून दिली शेवटची मानवंदना

राजेश घोडगेंना बॅट उंचावून दिली शेवटची मानवंदना 

शोकाकुल वातावरणात मडगावात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्याचा माजी रणजीपटू शैलीदार फलंदाज राजेश घोडगे (44) यांचे रविवारी मडगावच्या एमसीसी मैदानावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काल सोमवारी त्यांच्यावर मडगावच्या हिंदू स्मशानभूमीत हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव एमसीसी मैदानावर नेण्यात आले. त्या ठिकाणी क्रिकेटपटूनी बॅट उंचावून शेवटची मानवंदना दिली.

राजेश घाडगे रविवारी एमसीसी मैदावर चॅलेंजर्स संघाकडून क्रिकेट मॅच खेळत होते. नॉन स्ट्रायकिंग एन्डला उभा असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते पिचवर कोसळले. यावेळी त्यांची हृदय प्रक्रिया बंद पडली होती. त्यावेळी मैदानावर असलेल्या तीन डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यांना इस्पितळातही नेण्यात आले. पण, ते प्रयत्न व्यर्थ ठरले. काल अंतिम संस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव एमसीसी मैदानावर आणले, त्यावेळी एमसीसी मैदानावर त्यांच्यासोबत खेळणाऱया क्रिकेटपटूनी त्यांना बॅट उंचावून शेवटची मानवंदना दिली.

पत्नीला ‘कॅप’ घातले

राजेशचे पार्थिव जेव्हा एमसीसी मैदानावर आणले गेले, त्यावेळी संपूर्ण मैदानाचा परिसर भारावून गेला होता. अनेकांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. रविवारच्या सामन्यात राजेशने फलंदाजीसाठी उतरताना जे ‘कॅप’ घातले होते. तेच ‘कॅप’ त्यांच्या पत्नी डॉ. राखी घोडगे प्रभुदेसाई यांना घालण्यात आले. हा प्रसंग सर्वांचे हृदय हेलावून टाकणारा होता.

एमसीसी मैदान हे राजेश यांचे दुसरे घर बनले होते. सकाळ-संध्याकाळ ते या मैदानावर क्रिकेटसाठी झटताना आढळून यायचे. संध्याकाळच्या सत्रात नेट प्रॅक्मिटस त्यांची ठरलेलीच होती. सामना असला तर तो सलामीला यायचा. पण, या पुढे राजेश या मैदानावर कधीच आढळून येणार नाहीत. या विचारानेच येथील वातावरण भावूक बनले होते.

अनेक वाहिली श्रद्धांजली

यावेळी गोवा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष चेतन देसाई, गोवा रणजी संघाचे माजी कर्णधार प्रशांत काकोडे, क्रिकेटपटू स्वप्नील अस्नोडकर, मडगाव क्रिकेट क्लबचे अध्यक्ष योगेश नाईक, माजी अध्यक्ष राजेश नाईक, सचिव अपुर्व भेंब्रे, उपाध्यक्ष सुदेश भिसे, खजिनदार प्रसाद केंकरे, कमिटी सदस्य : प्रवीण लोटलीकर, संतोष लोटलीकर, संजीव फळारी, सुदेश नागवेकर, प्रा. मनोज हेदे, क्रिकेट प्रशिक्षक संदीप नाईक, क्रिकेट प्रशिक्षक व माजी रणजीपटू विनोद धामस्कर, डॉ. सतीश कुडचडकर, नगरसेवक रूपेश महात्मे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत कामत, वाघा मिसाळ इत्यादीनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पार्थिव मडगाव हिंदु स्मशानभूमीत नेण्यात आले.

मुलीने दिला चिताअग्नाr

राजेश यांची मुलगी सीया यांनी चिताअग्नी दिला. तसेच वडिल दामोदर घोडगे यांनी उर्वरित क्रिया केली. शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत हजारोंची उपस्थिती होती. त्यात राजेश यांचा मित्र परिवार, चाहते, क्रिकेटपटू, मडगावचे नगरसेवक इत्यादीचा समावेश होता. मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.