|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा, पीडब्लूडीचे कंत्राटदाराला आदेश

शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा, पीडब्लूडीचे कंत्राटदाराला आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

 राज्याच्या सार्वजनिक विभागाने शिवस्मारक प्रकल्पाच्या कंत्राटदाराला ताबडतोब काम थांबवण्याचे लेखी आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचे सरकारी वकिलाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळवले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कार्यवाही केली आहे.

अरबी समुद्रातील शिवस्मारक हा देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे जलपूजन केले होते. त्यानुसार स्मारकाच्या कामाला सुरुवातही करण्यात येणार होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम सुरु करु नका, असा तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला.  पर्यावरणवाद्यांच्या याचिकांचा राज्य सरकारला मोठा फटका बसला आहे. या आदेशामुळे शिवस्मारक प्रकल्पाचे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे. काम थांबवण्याच्या आदेशानंतर कंत्राटदाराला द्याव्या लागणाऱ्या निधीवर सार्वजनिक बांधकाम विभाग फेरविचार करणार आहे. 144 कोटी निधीचा पहिला टप्पा देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे. दरम्यान, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी या अनुषंगाने आज (16 जानेवारी) सकाळी 11 वाजता शिवस्मारक प्रकल्प कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे.