|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे

अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवस्मारकासारख्या विशेष प्रकल्पाला नियमांचे अपवाद असतात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे अधिसूचनेमध्ये ते प्रकाशित न केल्याने कामावर स्थगिती आली आणि ही नामुष्की ओढावली, असा आरोप शिवस्मारक समितीचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम थांबवण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानंतर आज शिवस्मारक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, सार्वजनिक बांधकाम, विधी व न्याय विभाग आणि कोस्टगार्डचे अधिकारी उपस्थित होते. शिवस्मारकासाठी पर्यावरण परवानगी देताना जनसुनावणी घेतली नाही, या प्रमुख कारणासाठी सुप्रीम कोर्टाने कामाला स्थगिती दिली आहे, असा दावा मेटे यांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करुन स्थगिती उठवण्याची अपील करणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी सीनियर कौन्सिलर यांची नेमणूक करणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.