|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लोकशाही भारताची सर्वात मोठी शक्ती!

लोकशाही भारताची सर्वात मोठी शक्ती! 

काँग्रेस अध्यक्षांचे विधान : अफगानचा केला उल्लेख

नवी दिल्ली

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी फेसबुक पोस्टमध्ये संसदेतील एका घटनेचा उल्लेख करत लोकशाही भारताची सर्वात मोठी शक्ती असल्याचे विधान केले आहे. आमच्या संसदेतील चर्चा पाहून अफगाणिस्तानच्या खासदाराने आपल्या देशात अशाप्रकारची चर्चा देखील बंदुकांच्या जोरावर होत असल्याचे उद्गार काढले होते. लोकशाही भारताची सर्वात मोठी शक्ती असून आम्हाला कोणत्याही स्थीत त्याचे रक्षण करावे लागेल असे राहुल यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी संसदेतील एका घटनेचा उल्लेख केला आहे. संसदेत सदस्य चर्चा करत असताना अतिथी दालनात अफगाणिस्तानातून आलेले काही खासदार मला दिसून आले. आमच्या संसदेत विदेशातील खासदार बसले असताना आम्ही आरडाओरड करत होतो.

चर्चेदरम्यान गोंधळ सुरू होता, सदस्य परस्परांवर ओरडत होते. विदेशी पाहुणे उपस्थित असताना संसद योग्यप्रकारे चालविली जाऊ शकत नाही का याचा विचार मी करत होतो असे राहुल म्हणाले.

 कामकाजानंतर अफगाणिस्तानचे खासदार माझ्या कार्यालयात भेटण्यासाठी आले. आमचे खासदार सभागृहात चर्चेवेळी ओरडत राहिल्याने मी त्यांची माफी मागितली. माझ्या या कृतीनंतर अफगाण खासदार रडू लागल्याचे पाहून मी अवाप् झालो. नेमकं काय घडलं अशी विचारणा मी त्यांना केली. ज्याप्रकारची चर्चा भारताच्या संसदेत होतेय, तशी चर्चा आमच्या देशात बंदुकांद्वारे होत असते असे अफगाण खासदाराने सांगितल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.