|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपसाठी इंग्लंडसह भारतही ‘फेवरीट’

वर्ल्डकपसाठी इंग्लंडसह भारतही ‘फेवरीट’ 

आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जेसॉन गिलेस्पीचे प्रतिपादन

ऍडलेड / वृत्तसंस्था

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजी फळी सर्वाधिक भक्कम असून यामुळे आगामी आयसीसी विश्वचषकासाठी यजमान इंग्लंडसह भारतीय संघ देखील फेवरीट असेल, असे मत माजी ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जेसॉन गिलेस्पीने मांडले आहे. बुमराहला सध्या काही कारणास्तव विश्रांती दिली असली तरी भारताची गोलंदाजी अतिशय भक्कम असल्याची प्रचिती येत आहे, असेही तो म्हणाला. सध्या अनेक कारणामुळे दर्जा खालावला असला तरी ऑस्ट्रेलियन संघ प्रत्यक्ष विश्वचषकात भरीव कामगिरी करु शकतो, असा आशावाद त्याने येथे व्यक्त केला.

‘घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळणार असल्याने यजमान संघ इंग्लंड फेवरीट ठरणार, यात आश्चर्याचे कारण नाही. पण, भारत देखील फारसा मागे नाही’, असे गिलेस्पीने यावेळी नमूद केले. ‘इतरांपेक्षा अतिशय वेगळी आणि अपारंपरिक शैली बुमराहसाठी दैवी देणगी ठरत आली असून याचमुळे त्याला सामोरे जाणे अधिक आव्हानात्मक असल्याचे फलंदाजांना जाणवत आले आहे. बुमराहला गोलंदाजी करताना पाहणे, हा देखील अनोखा अनुभव असतो. त्याने आपल्या वेगाला उत्तम आकार दिला असून याचमुळे तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे’, असे तो एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.

‘बुमराहने आपल्या गोलंदाजी शैलीवर बरीच मेहनत घेतली आहे. समोरील पाय टाकणे, हे त्याचे जणू हत्यार असते. समोरील पाय टाकताना त्याची ‘आर्म ऍक्शन’ संथ होते आणि क्रीझवर चटकन येत असताना त्याचे चेंडू भेदकतेने फलंदाजाचा वेध घेणारे ठरतात. या वेगवान ऍक्शन, गोलंदाजीमुळे अर्थातच समोरील फलंदाज डळमळतो आणि या परिस्थितीत त्यांच्याकडून निश्चितच चुका होण्याची शक्यता बळावते. अर्थात, अशी गोलंदाजी करणे अगदी सहजसोपे अजिबात नाही. बुमराह शारीरिकदृष्टय़ा तगडा आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये मोठे स्पेल टाकण्याची त्याची क्षमता निर्विवाद आहे. पूर्ण कसोटी सामन्यादरम्यान, पाचही दिवसात तो आपल्या गोलंदाजीच्या वेगाशी तडजोड करत नाही. त्यामुळे, तो अधिक भेदक ठरतो’, असे निरीक्षण गिलेस्पीने नोंदवले.

सध्या सुरु असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान उभय संघात 1-1 अशी बरोबरी असून तिसरी व शेवटची वनडे उद्या (शुक्रवार दि. 18) खेळवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, गिलेस्पीने यजमान संघाला दोन-एक महत्त्वाच्या खेळाडूंची अतिशय प्रकर्षाने उणीव जाणवत असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियन संघ जानेवारी 2017 पासून आपल्या पहिल्याच मालिकाविजयासाठी प्रयत्नशील असणार आहे. सध्या संघ संक्रमणातून जात असला तरी हे पर्वही खूप काही शिकवून जाणारे आहे, असे गिलेस्पी मानतो.

‘फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर महत्त्वाचे खेळाडू नसल्याने याची सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाला प्रकर्षाने उणीव जाणवत आहे. पण, आपला संघ प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेत अतिशय वेगळा असेल. त्यामुळे, दडपणाच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी नवोदित खेळाडूंना उत्तम संधी असेल. अगदी निवड समितीलाही यादरम्यान अनेक पर्याय आजमावून पाहता येणार असल्याने ही एक प्रकारे संधीच मानायला हवी. कारण, विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करताना निवडकर्ते एकत्र येतील, त्यावेळी त्यांच्यासमोर हे सर्व पर्याय खुले असणार आहेत’, असे गिलेस्पी म्हणाला.