|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चाकूच्या धाकाने लुटणारे 7 तासात जेरबंद

चाकूच्या धाकाने लुटणारे 7 तासात जेरबंद 

प्रतिनिधी/ खेड

ट्रकच्या केबिनमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत चालकाकडील मोबाईल व 5 हजाराची रोकड लुटण्याची थरारक घटना बुधवारी नातूनगर येथे घडली. या घटनेनंतर  अवघ्या 7 तासातच विलास सुभाष चव्हाण (18, पाटण), दिनेश नाना लोटे (18, पुणे) यांच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले. यातील एक आरोपी  फरार असून पोलिसांनी त्यांच्याकडील दुचाकी जप्त केली आहे.

  विनोद रामू यादव (वापी-गुजरात) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो ट्रकमधून माल भरून वापी येथून गोव्याला जात होता. नातूनगर येथे ट्रक उभा तो करून नदीवर आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करून आल्यावर ट्रकच्या केबिनमध्ये पूजा करत असताना अचानक तिघेजण केबिनमध्ये घुसले. चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत खिशातील 6 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व 5 हजाराची रोकड हिसकावून घेत मुंबईच्या दिशेने दुचाकीवरून त्यांनी पलायन केले. 

या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सर्वत्र नाकाबंदी केली. सहकाऱयांना रेल्वेस्थानक परिसरात पाठवले. यावेळी दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघाच्या खवटी येथे मुसक्या आवळण्यात यश आले. यातील एकजण फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

गुन्हय़ात वापरलेली दुचाकी चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व त्यांच्या सहकाऱयांनी अवघ्या 7 तासातच दोघांना गजाआड करत केलेल्या कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.