|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाभागात हुतात्मा दिन आज गांभीर्याने

सीमाभागात हुतात्मा दिन आज गांभीर्याने 

कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन, हुतात्मा चौक येथे अभिवादन

प्रतिनिधी/ बेळगाव

सीमालढय़ात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्मांना अभिवादन करण्यासाठी गुरुवार दि. 17 रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 9 वाजता हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल स्वीकारणार असल्याचे रेडिओवरून जाहीर केले. यामुळे बेळगाव, कारवारसह सीमाभागावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे मराठी भाषिकांतून संतापाचा उद्रेक झाला. 17 जानेवारी रोजी बेळगाव येथे झालेल्या गोळीबारात मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारागडी तर निपाणी येथे कमळाबाई मोहिते हे पाच जण हुतात्मे झाले.

सत्याग्रही नागाप्पा होसूरकर, बाळू निलजकर, गोपाळ अप्पू चौगुले यांचा तुरुंगात मृत्यू झाला. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 9 वाजता मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीमावासियांनी आपापले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीसह तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, म. ए. समिती महिला आघाडी, मराठी भाषिक युवा आघाडी, शिवसेना तसेच महानगरपालिकेतील मराठी नगरसेवकांच्यावतीने करण्यात आले आहे. 

आपापले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा

सीमाआंदोलनात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दि. 17 रोजी आपापले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, उपाध्यक्ष टी. के. पाटील व सरचिटणीस किरण गावडे यांनी केले आहे.

कंग्राळी खुर्द येथेही अभिवादन

सीमाप्रश्नी न्यायालयीन लढाई सुरू असताना सीमाप्रश्नी जोरदार आंदोलन हाती घेण्याची गरज आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. याकरिता हुतात्मांना अभिवादन करण्यासाठी गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 8.30 वाजता कंग्राळी येथील हुतात्मा चौक येथे मोठय़ा संख्येने जमावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे, सरचिटणीस मनोज पावशे, खजिनदार सुनील अष्टेकर, सुरेश डुकरे, भावकाण्णा पाटील, पिराजी मुचंडीकर, यल्लाप्पा बेळगावकर आदींनी केले आहे.