|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुंभमेळय़ात राष्ट्रपतींचा सहभाग

कुंभमेळय़ात राष्ट्रपतींचा सहभाग 

प्रयागराज / वृत्तसंस्था :

प्रयागराज येथे सुरू असेलल्या कुंभ 2019 मध्ये भाविकांसोबत देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी सहभाग घेतला आहे. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील कुंभमेळय़ात हजेरी लावली आहे. त्यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राज्यपाल राम नाईक हे देखील उपस्थित राहिले.

राष्ट्रपती कोविंद यांनी कुंभमेळय़ातील व्यवस्थांबद्द मुख्यमंत्री योगी तसेच राज्यपालांचे कौतुक केले आहे. अशाप्रकारच्या मोठय़ा आयोजनामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना तसेच बंधनांना सामोरे जावे लागते. पण स्थानिक या सोहळय़ाचे महत्त्व जाणतात. लाखो लोकांचे येथे होणारे आगमन स्थानिकांच्या विश्वासाचा प्रभाव दर्शवितो असे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत.

कुंभच्या माध्यमातून आम्ही स्वच्छ कुंभ तसेच पर्यावरण अनुकूल कार्यक्रमाचा संदेश देऊ इच्छितो. याकरता आम्ही स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. महात्मा गांधी हे रामराज्य तसेच भारतीय संस्कृतीच्या सुशासनाचे समर्थक होते असे विधान योगींनी केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी प्रयागराजमध्ये संगम तटावर पवित्र स्नानाचा लाभ घेतला होता. अमेठीतील 20 हजार लोकांना कुंभमेळय़ाचे दर्शन घडविण्याचा निर्णय इराणी यांनी घेतला आहे. अमेठी मतदारसंघातूनच त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती हे विशेष.

जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक तसेच धार्मिक मेळा असलेल्या कुंभचा प्रारंभ मंगळवारी झाला होता. मकर संक्रांतीच्या दिनी शाहीस्नानासह याचा शुभारंभ झाला असून 4 मार्चपर्यंत याचे आयोजन होणार आहे. या कुंभमेळय़ात सुमारे 15 कोटी भाविक सामील होतील असा अंदाज आहे.

योगी सरकारने कुंभमेळय़ासाठी 4236 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. हा आकडा 2013 च्या महाकुंभच्या तरतुदीपेक्षा तीनपट अधिक आहे. तसेच आतापर्यंतचा कुंभमेळय़ावरील हा सर्वाधिक खर्च ठरणार आहे.