|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » ज्योकोव्हिच, झ्वेरेव्ह, सेरेनाची आगेकूच

ज्योकोव्हिच, झ्वेरेव्ह, सेरेनाची आगेकूच 

ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा : जपानच्या ओसाकाने पराभवाची

नामुष्की टाळली, व्हीनस विल्यम्स मात्र स्पर्धेतून बाहेर

मेलबर्न / वृत्तसंस्था

सर्बियाचा नोव्हॅक ज्योकोव्हिच, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी येथील ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली तर जपानच्या नाओमी ओसाकाने निसटत्या फरकाने पराभवाची नामुष्की टाळली. व्हीनस विल्यम्सचे मात्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिला अव्वलमानांकित हॅलेपकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.

14 ग्रँडस्लॅम जिंकणाऱया ज्योकोव्हिचने कॅनडाच्या बिगरमानांकित डेनिस शापोव्हलोव्हविरुद्ध 6-3, 6-4, 4-6, 6-0 असा विजय संपादन केला असला तरी तिसऱया सेटदरम्यान त्याला संताप अनावर झाला. कृत्रिम दिवा बंद करण्याची विनंती फेटाळली गेल्यानंतर चिडूनच त्याने काही शब्द उच्चारले व याचा त्याच्या खेळावरच अधिक विपरीत परिणाम झाला. त्या सेटमध्ये ज्योकोव्हिच 4-6 अशा फरकाने पराभूत झाला. पण, चौथ्या सेटमध्ये 6-0 असा एकतर्फी विजय संपादन करत त्याने आपली स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली.

विद्यमान विम्बल्डन व अमेरिकन ग्रँडस्लॅम जेता ज्योकोव्हिचची पुढील लढत रशियाच्या 15 व्या मानांकित डॅनिल मेदव्हेदेव्हविरुद्ध होईल. डॅनिलने अन्य एका लढतीत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनला 6-2, 7-6 (3), 6-3 अशा फरकाने पराभूत केले. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने स्थानिक वाईल्डकार्डधारक ऍलेक्स बोल्टला 6-3, 6-3, 6-2 अशा फरकाने पराभूत केले. चौथे मानांकन लाभलेल्या झ्वेरेव्हची सुरुवात फारशी समाधानकारक झालेली नव्हती. पण, नंतर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्याला उत्तम यश लाभले. चौथ्या फेरीत मात्र त्याचा कॅनडाच्या मिलोस राओनिकविरुद्ध कस लागू शकतो.

जपानच्या केई निशिकोरीने पोर्तुगालच्या जाआओ सॉसाला 7-6 (6), 6-1, 6-2 अशा फरकाने पराभूत करत चौथ्या फेरीत सहज आगेकूच केली. आठव्या मानांकित व अमेरिकन ग्रँडस्लॅममधील माजी उपजेत्या निशिकोरीसाठी हा सहज विजय बराच दिलासा देणारा ठरला. चौथ्या फेरीत त्याचा मुकाबला पॅब्लो कॅरेनो बुस्टा व फॅबिओ फोग्निनी यांच्यातील जेत्याशी होईल.

सेरेना विल्यम्स चौथ्या फेरीत

महिला एकेरीतील लढतीत अमेरिकेची बलाढय़ खेळाडू सेरेना विल्यम्स चौथ्या फेरीत पोहोचली. तिने युक्रेनची टीनेजर खेळाडू डायना यॅस्त्रsमस्काचा 6-2, 6-1 अशा एकतर्फी फरकाने अक्षरशः धुव्वा उडवला. 37 वर्षीय विल्यम्स यंदा मेलबर्नमध्ये आठव्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी निर्धाराने मैदानात उतरली असून यॅत्रेमस्का उजव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याने तिला येथे बरेच झगडावे लागले. पुढील फेरीत तिची लढत हॅलेपविरुद्ध होईल.

अन्य एका सामन्यात अमेरिकन ग्रँडस्लॅम जेती नाओमी ओसाकाला तैवानच्या हेश सू-वेईविरुद्ध अगदी निसटत्या फरकाने नामुष्की टाळता आली. ओसाकाने 5-7, 6-4, 6-1 अशा फरकाने बाजी मारली. पहिला सेट गमावल्यानंतरही केवळ जिद्दीच्या जोरावर तिने यश खेचून आणले आणि चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चितही केले. मार्गारेट कोर्ट एरेनावरील या लढतीत ओसाकाने वर्चस्व गाजवत 11 पैकी 10 गेममध्ये बाजी मारली. ओसाकाची उपांत्यपूर्व फेरीतील स्थाननिश्चितीसाठी वांग क्वियांग व ऍनास्तासिया सेवास्तोव्हा यांच्यातील जेत्याशी लढत होईल. सहाव्या मानांकित एलिना स्वितोलिनाने चीनच्या झँग शुआईला 4-6, 6-4, 7-5 असे पराभूत केले. युक्रेनच्या 24 वर्षीय एलिनाची पुढील लढत बेल्जियमची एलिसे मेर्टेन्स किंवा अमेरिकेच्या मॅडिसन कीजविरुद्ध होईल.

नियम म्हणजे नियम! ऍक्रेडेशन कार्ड नसल्याने फेडररला लॉकर रुममध्ये प्रवेश नाकारला!

टेनिस स्टार असो वा आणखी कोणी असो, नियम म्हणजे नियम, असा खाक्या दाखवत अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅमच्या आयोजकांनी शनिवारी चक्क रॉजर फेडररला लॉकर रुममध्ये जाण्यास मज्जाव केला. फेडरर येथे आपले ऍक्रेडेशन कार्ड विसरुन आला होता आणि लॉकररुमच्या दरवाजात आल्यानंतर त्याला ही बाब लक्षात आली. त्यानंतर सहायक पथकातील एका सहकाऱयाने फेडररचे ओळखपत्र आणेपर्यंत या दिग्गज खेळाडूला ताटकळत राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या घटनेचा व्हीडिओ सोशल साईट्सवर वाऱयाच्या वेगाने फिरत राहिला. या व्हिडीओत लॉकररुमबाहेरील सुरक्षारक्षक फेडररला सूचना करत असल्याचे दिसून आले. फेडररचा सामना उशिराने स्टेफानोस त्सित्सिपासविरुद्ध होणार होता.

विराट-अनुष्काची फेडररशी भेट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याची पत्नी, बॉलिवूड तारका अनुष्का शर्मा यांनी शनिवारी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान रॉजर फेडररची भेट घेतली व त्याच्यासमवेत काही फोटो आपल्या सोशल अकाऊंट्सवरही पोस्ट केले. विरुष्का जोडीने यावेळी सेरेना व ज्योकोव्हिचच्या वेगवेगळय़ा सामन्यांनाही हजेरी लावली. विराट नोव्हेंबर 2018 पासूनच ऑस्ट्रेलिया दौऱयावर होता तर नववर्षाच्या प्रारंभी अनुष्काही तेथे पोहोचली होती.

 

Related posts: