|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » खेलो इंडियाचा शानदार समारोप : शाळेत एक तास खेळासाठी राखीव राहणार -प्रकाश जावडेकर

खेलो इंडियाचा शानदार समारोप : शाळेत एक तास खेळासाठी राखीव राहणार -प्रकाश जावडेकर 

ऑनलाईन टीम / पुणे :

खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली.

महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियाच्या पुरस्कार वितरण प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, केंद्रीय क्रीडा सचिव राहूल भटनागर, स्पोर्ट ऍथॉरीटी ऑफ इंडियाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर, अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) वंदना कृष्णा, स्पोर्ट ऍथॉरीटी ऑफ इंडियाच्या (साई) उप महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंदेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ऑलिम्पीक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी तथा सह सचिव ओंकार सिंग, स्टार स्पोर्टचे चैतन्य दिवाण आदी उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया उपक्रम सुरू केला. या निमित्ताने देशभरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला मिळाले आहेत. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे, मैदानावर घडणारा हाच उद्याचा नवा भारत आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळ सुध्दा महत्वाचा भाग आहे. क्रीडांगणावर खेळताना निघणारा घाम हेच खेळाडूंचे खरे बक्षीस असल्याचे त्यांनी सांगितले.

घुमला शिवछत्रपतींचा जयघोष

सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक महाराष्ट्राच्या संघाला मिळाल्यामुळे कार्यक्रमास्थळी मोठा जल्लोष सुरू होता. मान्यवरांच्या हस्ते चषक स्वीकारल्यानंतर पथक प्रमुखांनी महाराष्ट्राचे सर्व विजेते खेळाडू असलेल्या मंचावर चषक नेला. त्या ठिकाणी विजेतेपदाचा चषक नेल्यानंतर विजेत्या खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, त्याला समारंभासाठी उपस्थित असणाऱया सर्वांनी जोरदार साथ दिली, त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ शिवछत्रपतींचा जयघोष दुमदुमत होता.

Related posts: