|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आजपासून

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आजपासून 

सावंतवाडीत सभा : 50 नेते उपस्थित राहणार!

प्रतिनिधी / सावंतवाडी:

काँग्रेस पक्षातर्फे केंद्र राज्यातील भाजप शासनाविरोधात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. कोकणातील जनसंघर्ष यात्रेची सुरुवात सोमवारी सावंतवाडीतून होत आहे. सावंतवाडीत सोमवारी सायंकाळी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेला दहा हजाराहून अधिक जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासह राज्य केंद्रातील 50 नेते या यात्रेला उपस्थित राहणार आहेत. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पक्षाची जाहीर सभा प्रथमच जिल्हय़ात होत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य केंद्र सरकारविरोधात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर ही यात्रा कोकणात येत आहे. या यात्रेत नोटाब्ंादी, राफेल करार, जीएसटी, शेतकऱयांच्या आत्महत्या हे विषय हाताळत काँग्रेसने सरकारविरोधात रान उठविले होते. कोकणात सोमवारपासून कोकणातील जनसंघर्ष यात्रेला सावंतवाडीतून सुरुवात होत आहे. कोकणात काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी झगडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसची स्थिती नाजूक झाली होती. काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी झगडत असतांना माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची एन्ट्री झाली होती. त्यामुळे पक्षाला चांगले दिवस आले होते. मात्र, काँग्रेसला रामराम ठोकत राणेंनी स्वतंत्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा बॅकफुटवर गेला.

दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राणेंच्या अधिपत्याखाली असलेली काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून राणेंना धक्का दिला होता. त्यामुळे राणेंविरुध्द चव्हाण असा संघर्ष निर्माण झाला होता. या काळात खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी जिल्हय़ातील काँग्रेस पक्ष टिकविण्यासाठी प्रयत्न केले. आता आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतांना काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा कोकणात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. येथील गांधी चौकात सोमवारी सायंकाळी 4 वाजता सभा होणार आहे. या सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केले आहे.