|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » देवाचे पाळण्यातले पाय !

देवाचे पाळण्यातले पाय ! 

‘आपली नाळ ज्या मातीत पुरली जाते; त्या मातीची ओढ माणसाच्या मनात कायम असते.’ रेल्वे डब्यात कुणीतरी हे म्हणाल्याचे माझ्या कानावर पडले. मी विचार करू लागलो. प्रवासाचा हा मोठाच लाभ असतो. स्वत:शी मुक्त संवाद साधता येतो. ‘नाळ’ या एका शब्दाने माझ्या मनाचा ताबा घेतला. आपण कुठे जन्मायचे हे आपल्या हातात नसते. कुठल्या मातीत आपली नाळ पुरली जावी हेही आपण ठरवू शकत नाही. पण आपल्याला त्या मातीशी जुळवून ठेवते. जसे मातीचे तसेच त्या त्या ठिकाणच्या परंपरांचेही असते. आपण त्या पद्धती, परंपरांशी आपल्याही न कळत कायमचे जोडून जातो. तारुण्याच्या, आयुष्य घडवण्याच्या घाईगर्दीत ही नाळ सुटल्या-तुटल्यासारखी वाटली तरी तुटता तुटत नाही. जगण्यातून जरा फुरसत मिळाली की ते सारे नाळेशी जोडलेले आपल्या आत उमलू लागते. उमलून आनंद देऊ लागते. कधी हातून काही निसटले याची कातर जाणीव होते तर कधी आगळय़ाच जाणीवेने हरकून जायला होते. नाळ ही सारी किमया घडवते. नकळत घडवते. आपल्याला छान वारसदार बनवते. आपल्या आवडी-निवडी, वैचारिक धारणा यांचा अशा जोडून जाण्याशी काहीच संबंध नसतो. नाकारू तरी नाकारता न येणारी ही जोडणी असते.

 आपले अभिव्यक्त होणेही एखाद्या वारसाशी आपली नाळ जुळल्याचा पुरावाच असते. देवधर्म न मानणारी एखादी व्यक्तीही सहजच म्हणून जाते की, ‘अरे, त्यात काही ‘राम’ नाही!’ ‘वा, अगदी देवासारखे हजर झालात!’ किंवा ‘मी विचारच करत होतो की कुणाला बोलवावे, तेवढय़ात ‘दत्त’ म्हणून हे हजरच!’ अथवा ‘अहो, काय सांगू? देव अगदी पाण्यात घालून बसलो होतो!’ मी विचार करत होतो आणि माझ्या हाती एक छान सूत्र लागले. म्हणी किंवा वाक्प्रचार म्हणजेही ‘नाळ’च आहेत ना?    

गोदूताईंकडचा प्रसंग

 मोठय़ा योगायोगाने माझी गोदाताई परुळेकरांशी भेट झाली. जुहूच्या त्यांच्या राहत्या घरी मी त्यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. आदिवासी भागात त्यांनी मोठे कार्य केले होते. त्याबद्दल त्यांना ‘वनयोगी’ हा पुरस्कार देण्याचे आमच्या संघटनेने ठरवले होते. गोदाताईंना मी माझी ओळख सांगितली. पुरस्काराची कल्पना दिली. एव्हाना मी ठार ‘उजव्या’ विचाराचा आहे हे त्यांना समजले होते. ‘वनयोगी’ मधल्या योगी शब्दावरून त्यांनी माझी खूप खरडपट्टी काढली. असल्या सगळय़ा जुनाट कल्पना टाकून देऊ तरच आपण पुढे जाऊ शकू हेही ठणकावून सांगितले. मी शांतपणे सगळे ऐकले. ‘हो-नाही’च्या हिंदोळय़ावर खूप झपूर्झा झाला. वारंवार भेटीही होत गेल्या. गोदाताईंनी कै. दि. वि. गोखल्यांना मुलाखतही दिली. पुरस्काराचा स्वीकारही केला. मुख्य गम्मत तर पुढेच आहे.माझे गोदाताईंकडे जाणे येणे होत असताना आमची जवळीकही वाढली. एकदा गप्पांच्या ओघात त्या मला म्हणाल्या, ‘अरे, आज मी आवरा-आवरी करताना मला हा अल्बम सापडला. खायला काही देते तोवर तू अल्बम बघ!’ अल्बम पाहताना मला खूप मजा वाटत होती. फोटो बघून मी हसायला आणि त्या समोर यायला एकच गाठ पडली. ‘का हसलास रे?’ त्यांनी मला विचारले. ‘हा फोटो तुमचाच आहे का?’ असे विचारून मी एक फोटो त्यांना दाखवला. क्षणभर त्या कुठेतरी हरवल्यागत झाल्या. जराशाने म्हणाल्या, ‘हो.. लग्नानंतरची पहिली संक्रांत.. हलव्याचे दागिने घातलेली ही मीच आहे.. पुण्यातला फोटो आहे!’ किती गोड दिसत होत्या गोदुताई… फोटोतल्या नव्हे, माझ्या समोरच्या! नाळ अशीच जोडली जात असेल का? मुंबईतल्या दुर्गाबाई भागवतांच्या घरी आणि एशियाटिक लायब्ररीत मी त्यांना भेटायला नेहमी जात असे. दरवेळी वेगळा खाऊ मिळत तर असेच पण कितीतरी नव्या गोष्टी कळत! दोन्हीमुळे पोट भरत असे. ‘तू मूळचा पंढरपूरचा ना रे?’ एकदा त्यांनी मला विचारले. मी हो म्हटले तशी त्या म्हणाल्या, ‘एकदा आपण वाखरीला जाऊया… आम्हा भागवतांचा वाखरीशी संबंध आहे. ठरवून जाऊ एकदा!’ जाणे झाले नाही ही बोच आहेच पण वाखरीशी त्यांची नाळ जोडली गेली आहे हे मला आत्ताही जाणवते आहे. चर्चगेटच्या ‘पुरोहित’मध्ये आम्ही जेवत असताना दुर्गाबाई मला म्हणाल्या, ‘तुझ्या बायकोला एकदा घेऊन ये. राहिल मुंबईत चार दिवस! तिला गोधडी शिवायला शिकवेन मी! मोठय़ा निगुतीने करावे लागते हे काम.. गोधडी शिवायला आली पाहिजे!’ दुर्गाबाई माझ्या बायकोची नाळ कशाशी तरी  जोडायचा प्रयत्न तर करत होत्या. गोधडी दिसली तरी मला दुर्गाबाईंची आठवण येते.. जणू गोधडीशी त्यांच्या स्मृतीची नाळ जोडली गेली आहे.

दान पावलं, वासुदेवाला !’

  पंढरपूर सुटले त्याला खूप काळ झाला. जाणे-येणे घडले तरी गाव सुटले याला पस्तीस-छत्तीस वर्षे झाली. पुढे खूप फिरणे झाले. जगभर भटकलो आणि आत्ता आठवडय़ाभरापूर्वी मी माझ्या नागपुरातल्या घरातच भांबावून गेलो. मी राहतो चौथ्या मजल्यावर. वेळ पहाटेची होती. अचानकच मला कुणी ओढून भूतकाळात नेते आहे असे झाले. चक्क मोरपीसाचा टोप आणि अंगरखा घातलेल्या ‘वासुदेवा’चे दर्शन झाले. आधी तो म्हणत असलेले गाणे आणि टाळ ऐकू आले. मला वाटले भास असेल. ‘नागपुरात वासुदेव? शक्मयच नाही!’ पण आवाज स्पष्ट होत गेला. मी बाल्कनीतून डोकावलो तर वासुदेवच की! मी का भांबावलो? मी का शहारलो? का गहिवरून आले? मी घाईने नातवंडांना झोपेतून उठवले. सुपात गहू घेऊन सुनेबरोबर नातवंडांना घेऊन रस्त्यावर गेलो. नातवंडांना काय घडतेय हे कळले नाही पण एका नव्या ‘अनुभवाचा’ त्यांनाही आनंद वाटलाच.. मी त्यांची नाळ माझ्या भूतकाळाशी जोडत होतो का? नाळ मुद्दामहून जोडण्याचीही गरज नसते. आपल्या रक्तातून, ‘जीन्स’मधून हे ऋणानुबंध पिढी-दरपिढी संक्रमित होत असावेत. बोलण्यापुरताच गोडवा नव्हे तर अवघे जगणे गोड करणारा हा संक्रांतीचा सणच असतो! माझी नात आहे जेमतेम चार वर्षांची! तिच्या मनात प्रयत्नपूर्वक काही बिंबवण्याचा आम्ही कुणीच कधी प्रयत्न केला नाही. एकदा माझ्या व्हाट्सअपवर एक फोटो आला होता. कापडाची झोळी.. गावाकडे झाडाला टांगतात तशी झोळी. त्या झोळीतल्या बाळाचे फक्त दोन पाय झोळी बाहेर दिसत होते. गुडघ्यापर्यंतचे सारे शरीर झोळीत दडलेले. दिसणारे फक्त पाय..पायाचा तिढा.. पायात वाळे… इतकेच. मी नातीला बोलावले. विचारले, ‘हे पाय कुणाचे आहेत गं..’’ तिने जरासे पाहिले आणि म्हणाली, ‘तुला माहीत नै आब्बा… किस्नबाप्पाचे आहेत!’ पायवरच्या निळसर छटेने तिने ओळखले असेल का? पण तरी हेच कळते की कन्हैय्याशी निळसरपणाची नाळ जोडली आहेच की …. उमेदीच्या, व्यवहाराच्या, कमाईच्या दगदगीत नाळ तुटल्यासारखी वाटली तरी आपला आपल्याशीच संवाद जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा लक्षात येते की नाळ सुटत नसते की तुटत नसते.. आपल्या आत राहून ती आपल्याला सदैव सांभाळत असते, आई सांभाळते तशी !

विवेक घळसासी

Related posts: