|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पंतप्रधानपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

पंतप्रधानपदासाठी मोर्चेबांधणी सुरू 

 लोकसभा निवडणूक घोषित होण्यासाठी अवघा दीड महिना उरला असताना मोदींसमोर संकटांची मालिका उभी आहे. आता पंतप्रधानपदाची शर्यत खुली आहे असे स्पष्ट चित्र दिसू लागल्याने मोदींची जागा पटकावण्यासाठी त्यांच्या विरोधकांची धावपळ सुरू झाली नसती तरच नवल.

सारे कसे अजबच. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आता किमान दहा वर्षे तरी ते गादी सोडत नाहीत अशी सर्वसाधारण माणसाची अपेक्षाच नव्हे तर खात्री होती. जो नेता ‘अच्छे दिन’ आणणार आहे तो टिकणार. आता कसलीच काळजी नाही. स्वर्गच धरतीवर अवतरणार आहे असे स्वप्न होते. आता 5 वर्षे संपत आली आणि गजबच घडताना दिसत आहे. 56 इंचाची छाती असल्याची शेखी मिरवणारे मोदी आता दुसरी टर्म मिळावी म्हणून कासावीस झाले आहेत. घायकुतीला आलेले आहेत. परत सत्ता मिळवण्यासाठी सर्व काही करायला तयार आहेत. एक अगतिकता त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत आहे. एक धाकधूक दिसत आहे.

 गेल्या वषी भर लोकसभेत राहुल गांधी यांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवले होते. ‘मोदी आणि अमित शाह याना माहीत आहे की जर आपली सत्ता गेली तर आपल्याला बऱयाच अग्निदिव्याला सामोरे जावे लागेल’ अशा अर्थाचे फार गंभीर विधान काँग्रेस अध्यक्षांनी मोदी सरकारवरील अविश्वास ठरावावेळी केले होते. विरोधी पक्षांच्या या गर्भित धमकीकडे सत्ताधाऱयानी त्यावेळी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यासारखे वाटले. आपण बाजी मारून नेऊ असा त्यांचा समज दिसला. मात्र, नवीन वर्ष उजाडल्यापासून मोदींच्या पायाखालची वाळू झपाटय़ाने सरकत आहे असे वाटत आहे. असे असले तरी आजमितीस मोदींच्या बरोबरीचा एकही नेता नाही हे देखील तितकेच खरे.

 दुसरी टर्म मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना गोष्टी मात्र वेगळय़ाच घडू लागल्या आहेत. आता मोदींना त्यांच्या घरातून अहेर सुरू झाले आहेत. येत्या महिनाभरात जर राम मंदिर उभारणी सुरू झाली नाही तर आपण मोदींच्या खुर्चीखालीच फटाका लावू अशी उघड धमकी सुब्रमण्यम  स्वामी यांच्यासारखे  नेते  देऊ  लागले  आहेत. मोदींनी आपल्याला वापरूनच घेतले,  मंत्रिपद  दिले  नाही  याची  स्वामींना  खंत  आहे. संघ परिवार आपल्या पाठीशी आहे. आता आपले कोणी  वाकडे करू शकत नाही असा स्वामींचा होरा आहे. मंदिर प्रश्नाबाबत संघ परिवार नाराज आहे अशी वृत्ते असतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तान बरोबर युद्ध सुरू नाही मग आपले सैनिक एवढे का हुतात्मा होत आहेत असा विचारलेला प्रश्न म्हणजे मोदी सरकारची अप्रत्यक्ष टीकाच होय. राफेलबाबत ‘हिंदू’ या प्रथितयश दैनिकाने केलेल्या तपासणीमुळे या प्रकरणात एक नवीन जान आली आहे. तीस वर्षापूर्वी बोफोर्सवर देखील या दैनिकाने केलेल्या तपासामुळे तत्कालीन राजकीय वातावरण बदलायला मदत झाली होती. अर्थव्यवस्थेचे रडगाणे सुरू आहे. शेतकऱयाच्या आत्महत्या वाढत आहेत. तात्पर्य काय तर लोकसभा निवडणूक घोषित होण्यासाठी अवघा दीड महिना उरला असताना मोदींसमोर संकटांची मालिका उभी आहे.

दुष्काळात तेरावा महिना या न्यायाप्रमाणे नितीन गडकरी यांचे नाव नेतृत्वपदासाठी भाजपमध्ये घेतले जात आहे. गडकरींनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर वेळोवेळी चपखलपणे तोफ डागून मोदींनादेखील हैराण केलेले आहे. या साऱया घटनांचा अर्थ स्पष्ट आहे. आता पंतप्रधानपदाची शर्यत खुली आहे असे स्पष्ट चित्र दिसू लागल्याने मोदींची जागा पटकावण्यासाठी त्यांच्या विरोधकांची धावपळ सुरू झाली नसती तरच नवल. उत्तर प्रदेशातून अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाबरोबर आघाडी बनवून बसप नेत्या मायावती यांनी एक प्रकारे आपली उमेदवारीच जाहीर केली आहे. या आघाडीतून काँग्रेसला खडय़ासारखे वगळून मायावतींनी राहुल गांधीपुढे एक नवीन आव्हान उभे केले आहे तर गैरभाजप विरोधकात पहिल्या पंक्तीला बसण्याचा त्यांचा मानस आहे. मायावती स्वतःला सोनिया गांधींपेक्षा थोर नेत्या मानतात. सोनियाना गांधी-नेहरू घराण्यामुळे नेतृत्वपद मिळाले. आपण ते स्वकष्टाने मिळवले आहे हे त्यांनी वेळप्रसंगी अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेशच्या 80 पैकी अवघ्या 2 जागा काँग्रेसला सोडून त्यांनी राहुल आणि सोनिया गांधींची थट्टाच केली आहे. अखिलेशना उत्तर प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री बनायचे आहे पण त्याकरता मायावती पंतप्रधान बनल्या पाहिजेत.

 मायावतींप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील महत्त्वाकांक्षी आहेत आणि राहुलना त्या पाण्यात पाहतात. त्यांनी आयोजित केलेली ’युनाइटेड इंडिया’ रॅली म्हणजे युनाइटेड प्रंटप्रमाणे गैर-भाजप सरकार बनवण्यासाठी सुरू केलेली धडपड होय. राहुल आणि सोनियानी या रॅलीपासून दूर राहून आपला प्रतिनिधी पाठवला तो याचमुळे. ममतांना पुढील सरकारात काँग्रेस असली तरी चालेल पण तिच्याकडे नेतृत्व असू नये. ते आपल्याला मिळावे अशी त्यांची अलिखित मागणी आहे. ममतादीदीनी स्वतःच्या हिमतीने डाव्यांची सत्ता उलथवली आणि आता मुख्यमंत्री म्हणून त्या दुसऱयांदा राज्य करत आहेत.

शरद पवारांनी आता काँग्रेसच्या कलाने घेऊन पंतप्रधानपद मिळेल का हे बघण्याचा प्रयोग चालवला आहे असे दिसत आहे. सद्याच्या एकूण परिस्थितीत पवारासारखा तालेवार नेता आपल्या बरोबर असेल तर आघाडीच्या राजकारणात आपल्याला फार मदत होऊ शकेल असा राहुल यांचा कयास आहे. महाराष्ट्र एकमेव मोठे राज्य आहे जेथे काँग्रेसला जागावाटपाचा फारसा त्रास झालेला नाही. ‘आपल्याला सर्व काही मिळाले आहे’ असे शरदराव म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे.

काँग्रेस ही देशातील सर्वात जुनी पार्टी असल्याने राजकारण कसे करावे हे काँग्रेसीला चांगले कळते. पंतप्रधानपदाच्या विषयी राहुल गांधी फारसे बोलत नसले तरी त्याचा अर्थ त्यांनी सत्ता संन्यास घेतला आहे असा नव्हे. स्वातंत्रोत्तर काळातील संघर्ष करून मिळालेले नेतृत्वपद टिकवण्याची किमया करणारे गांधी-नेहरू घराण्यातील राहुल हे पहिलेच आहेत. मोदींनी त्यांना नेता बनवले आहे. आता ’गुरुची विद्या’ गुरुवर उलटवण्याचा भरपूर प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. सरतेशेवटी राहुल पंतप्रधान बनणार की नाही हे काळच दाखवेल, पण भावी काळात राहुलना बाजूला ठेवून कोणतेही राजकारण करता येणार नाही हे मात्र खरे.

सुनील गाताडे

 

Related posts: