|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भ्रमरगीताचा प्रारंभ

भ्रमरगीताचा प्रारंभ 

राधा उद्धवांना म्हणाली-तुम्ही माझ्या स्वामींचा संदेश आणला आहे काय? परंतु त्या संदेशाने मला कांही शांति मिळणार नाही. विरहणीचें दु:ख कोण समजू शकेल? मला शांति देऊ शकेल असे कोणतेच शास्त्र, मंत्र किंवा ज्ञान या जगात नाही. मी तर प्रतिक्षण श्रीकृष्णांचे भजन, ध्यान आणि दर्शनात दंग आहे. राधेची क्षीण दशा पाहून सर्वच गोपी, वृक्षवेली, फुलें, कळय़ा, पशु, पक्षी रडू लागले. राधेचे दिव्य प्रेम पाहून उद्धवांनाही रडू आले. मी अशा राधेला काय उपदेश देईन? राधेच्या मुखकमलाच्या सुवासाने एक भ्रमर आकर्षित होऊन भोवती फिरू लागला. राधिका त्याला दूर सारू लागली. तू तर कपटी आहेस, माझ्या जवळ येऊ नकोस. उद्धवांनी पुन्हा राधेला नमस्कार केला.

श्रीमद्भागवताच्या दहाव्या स्कंदाच्या सत्तेचाळीसाव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकापासून ते एकविसाव्या श्लोकापर्यंतचे श्लोक हे भ्रमरगीत या नांवाने ओळखले जातात. भ्रमरगीतांत तसे तर राधिका भ्रमराला रागे भरत आहे, परंतु त्यांचे लक्ष्य उद्धव आहे. त्यांनी कांही गोष्टी उद्धवाला सुनावल्या आहेत. भ्रमरगीत एकवचनांत आहे आणि वेणुगीत युगुलगीत इत्यादी बहुवचनांत. भ्रमरगीताचा भावार्थ असा -अरे कपटी प्रियकराच्या सख्या मधुकरा! तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस. कारण श्रीकृष्णांची जी वनमाला आमच्या सवतीच्या वक्षःस्थळाच्या घर्षणाने चुरगळली गेली, त्या माळेला लागलेले पिवळे केशर तुझ्या मिशांनासुद्धा लागले आहेत. मधुपती श्रीकृष्ण मथुरेतील मानी नायिकांची मनधरणी करू दे आणि त्यांचा जो केशररूप प्रसाद, ज्याचा यादव सभेत उपहास होणार आहे, तो त्यांच्याजवळच राहू दे! तो तुझ्याकडून येथे पाठवण्याची काय आवश्यकता आहे? तू फुलांतील मध एकदा घेऊन उडून जातोस, तसेच तेही फक्त एकदाच आपले मोहक अधरामृत पाजून आम्हांला सोडून निघून गेले. बिचारी लक्ष्मी त्यांच्या चरणकमलांची सेवा कशी करते कोण जाणे! बहुधा श्रीकृष्णाच्या गोड गोड बोलण्याने तिचेसुद्धा चित्त चोरले असावे. म्हणूनच तिला त्यांचे खरे रूप कळले नाही. अरे भ्रमरा! वनात राहणाऱया आमच्यासमोर तू यदुपती श्रीकृष्णांचे पुष्कळसे गुण का गात आहेस? ते आम्हांला काही नवीन नाहीत. ज्यांच्याजवळ सदा विजय असतो, त्या श्रीकृष्णांच्या नव्या सख्यांच्यासमोर जाऊन त्यांचे गुणगान कर. कारण यावेळी त्यांनी त्यांच्या हृदयाची पीडा शमवली असल्याने त्या त्यांना प्रिय आहेत. तू करीत असलेल्या गुणगानावर प्रसन्न होऊन तू मागशील ती वस्तू त्या तुला देतील. हे भ्रमरा! त्यांचे कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भुवयांच्या इशाऱयाने त्यांना वश होणार नाहीत, अशा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पाताळात कोणत्या स्त्रिया आहेत? स्वतः लक्ष्मीसुद्धा ज्यांच्या चरणरजांची सेवा करीत असते, तिच्यापुढे आमची काय योग्यता? परंतु तू त्यांना सांग की, तुमचे नाव उत्तमश्लोक आहे, ते दीनांवर दया करण्यामुळे. अरे मधुकरा! तू माझ्या पायावर डोके टेकवू नकोस. तू मनधरणी करण्यात पटाईत आहेस, हे मी जाणते.

 

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: