|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » करीना काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ?

करीना काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ? 

ऑनलाईन  टीम  / भोपाळ : 

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा रंगली आहे. कारण करीनाला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. त्यासाठी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भोपाळ मतदारसंघातून करीना कपूरला उतरवण्याची तयारी सुरु आहे.

मागील अनेक वर्षांपासून भोपाळ लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम कोणी नेता नाही तर अभिनेता करु शकतो, असे भोपाळमधील काही काँग्रेस नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे करीनाला उमेदवारी मिळावी, असा आग्रह या नगरसेवकांनी वरिष्ठांकडे धरला आहे. करीना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याने भोपाळची जागा जिंकणे सोपे होईल, असे गणित गुड्डु चौव्हान आणि अनिस खान या नगरसेवकांनी मांडले. तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे. याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा नगरसेवकांनी केला आहे.
करीना कपूर भोपाळमधील पतौडी या राजघराण्याची सून आहे. करीनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. भोपाळ आणि पतौडी घराण्यातील याच कनेक्शनचा फायदा करीनाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील नेत्यांना वाटतो. यासाठी लवकरच काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहेत.