|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑस्ट्रेलियन संघात कुर्तिस पॅटर्सनला संधी

ऑस्ट्रेलियन संघात कुर्तिस पॅटर्सनला संधी 

सिडनी / वृत्तसंस्था

मायदेशातच भारताविरुद्ध नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी बहरातील कुर्तिस पॅटर्सनला संधी दिली आहे. फलंदाजीतील अपयशाची भरपाई करता यावी, यासाठी पॅटर्सनचा त्यांनी समावेश केला. न्यू साऊथ वेल्सच्या 25 वर्षीय पॅटर्सनने होबार्टमध्ये मागील आठवडय़ात क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्ध लागोपाठ शतके झळकावली होती. त्याची ऑस्ट्रेलियन निवड समितीने येथे प्राधान्याने दखल घेतली.

‘सातत्याने शतके झळकावली तर राष्ट्रीय संघात निश्चितपणाने संधी देऊ, अशी आम्ही देशातील युवा खेळाडूंना, फलंदाजांना अभिवचन देत आलो आहोत. पॅटर्सनची निवड हा त्याचाच एक दाखला आहे’, असे राष्ट्रीय निवडकर्ते ट्रेवर हॉन्स पत्रकातून म्हणाले. कुर्तिसने एनएसडब्ल्यू संघातर्फे सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारले असून लंकेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यास तो निश्चितच पात्र आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले. कुर्तिस पॅटर्सनला 26 टी-20 सामन्यांचा अनुभव असून यात त्याने 48 या सर्वोत्तम धावसंख्येसह 442 धावांचे योगदान दिले आहे. वनडे व कसोटीत मात्र अद्याप त्याला पदार्पणाची अपेक्षा आहे.

सध्या ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय खराब फॉर्ममधून जात असून अलीकडेच भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्यांच्या अगदी एकाही फलंदाजाला एकही शतक झळकावता आले नाही. 4 किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत घरच्या भूमीत खेळताना एकही शतक झळकावले न जाण्याची त्यांच्यासाठी ही 1882-83 नंतरची पहिलीच वेळ ठरली. ऑस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यातील पहिली दिवस-रात्र कसोटी गुरुवारपासून ब्रिस्बेन येथे खेळवली जाईल. त्यानंतर उभय संघ कॅनबेरा येथे पुन्हा आमनेसामने भिडणार आहेत.