|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कासार्डेत दाट धुक्याने घेतला चिपळुणच्या बसचालकाचा बळी

कासार्डेत दाट धुक्याने घेतला चिपळुणच्या बसचालकाचा बळी 

वार्ताहर/ तळेरे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कासार्डे जांभुळवाडी येथे सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास पडलेल्या दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चिपळुणमधील बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये ट्रकचालक व क्लीनरही गंभीर जखमी झाले. दाट धुक्यामुळे समोरचा ट्रक न दिसल्याने गोव्याच्या दिशेने जाणाऱया ‘आत्माराम’ बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघातात खासगी बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून बस चालक मंदार तटकरी (25, चिपळूण) जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबतचा क्लीनर संजय ज्ञानोबा धोंगडे (32, लातूर) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ट्रक चालक दिलीप आंबर्डेकर (54, रत्नागिरी) यांच्या उजव्या पायाला आणि डोक्मयाला मार लागल्याने ते गंभीर जखमी आहेत. बसच्या केबिनमध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता.

पुण्याहून गोव्याकडे निघालेल्या बसने (एम. एच. 14 / जी. यू. 8868) कासार्डे प्राथमिक शाळेजवळ सिमेंट भरून रत्नागिरीहून वेंगुर्ल्याला (एम. एच. 12, ए. यू. 4534) निघालेल्या ट्रकला मागून वेगाने धडक दिली. गडद धुके असल्याने ट्रक हळूहळू गोव्याच्या दिशेने चालला होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱया बसलाही पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने आयत्यावेळी नियंत्रण राखता आले नाही. ही बस ट्रकला जोरदार धडकल्याने बस चालक  तटकरी याचा जागीच मृत्यू झाला. चालक व क्लीनर केबीनमध्येच अडकून पडले होते. अपघातानंतर बसचा दरवाजा चेपला गेल्याने प्रवासीही आत अडकले होते. अखेर बसची खिडकी फोडून स्थानिक ग्रामस्थांनी शिडीद्वारे प्रवाशांना बाहेर काढले. चालक आणि क्लीनर यांनाही अथक परिश्रमाने बाहेर काढण्यात आले.

बस चालक, क्लिनर आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी भाऊ शेटये, आण्णा खाडये, प्रसाद जाधव, रुपेश कानसे, शिवाजी डोईफोडे, पप्या केसरकर, शुभम खटावकर, तेजस भांबुरे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. गंभीर जखमी क्लिनर आणि ट्रक चालकास तात्काळ कासार्डे आणि वैभववाडी येथील 108 नंबरच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.

कासार्डे पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एन. एस. खाडये यांनी अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.