|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंधरवडय़ात आणखी 20 गावात टँकरने पाणी

पंधरवडय़ात आणखी 20 गावात टँकरने पाणी 

प्रतिनिधी/ सांगली

जिल्हय़ात दुष्काळाची दाहकता वाढतच असून पंधरा दिवसात आणखी 20 गावात नव्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्हय़ातील 61 गावे आणि 380 वाडय़ावस्त्यांना 51 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे.

पावसाळय़ामध्ये दुष्काळी जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ यासह जिल्हय़ातील काही तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जसे उन्हाची तीव्रता वाढले तसे पिण्याचे पाणी आणि चाऱयाचा प्रश्न गंभीर होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून दुष्काळी तालुक्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात ये असून या गावे आणि टँकरेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे.

 डिसेंबरअखेर जिल्हय़ातील जत 10, कवठेमहांकाळ पाच, खानापूर तीन, आटपाडी 10 आणि तासगाव एक अशा 41 गावांमध्ये 29 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये जानेवारीपासून दुपटीने वाढ झाली आहे. सध्या जिल्हय़ातील 61 गावे आणि 380 वाडय़ावस्त्यांना 51 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक जत तालुक्यातील 23, आटपाडी 16, कवठेमहांकाळ 6, खानापूर 5 आणि तासगाव एक अशा 61 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

           फेब्रुवारीपासून आणखी संख्या वाढणार

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहीर, कुपनलिकांच्या पाणीपातळी वेगाने खालावत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने आणखी काही गावे आणि वाडय़ा-वस्त्यांना पाण्याची टंचाई भासणार असल्याने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. दुष्काळी तालुक्यातील जनतेला मे अखेरपर्यंत पाणी आणि चाऱयासाठी चांगलीच धावाधाव करावी लागणार असल्याने त्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

तालुकानिहाय गावे

 जत-सोन्याळ, व्हसपेठ, लमाणतांडा, दरिबडची, कोत्येंव बोबलाद, तिकेंडी, आसंगी, माडग्याळ, जाडरबोबलाद,  निगडीखुर्द, एकुंडी, करेवाडी, अचकनहळ्ळी, सालेकिरी, बसरगी, खोजनवाडी, सोनलगी, दरिकोणुर, खैराव, पांढरेवाडी, देवनाळ. आटपाडी-आटपाडी, पुजारवाडी, आंबेवाडी, लेंगरेवाडी,  बेंबेवाडी, दिघंची-राजेवाडी, उंबरगाव, कौठुळी, तडवळे, पिंपरीखुर्द, विभूतवाडी, मापटेमळा, माडगुळे,  दिघंची, लिंगीवरे, विठठलापूर, राजेवाडी, निंबवडे, मुढेवाडी, पळसखेल, आवळाई, पिंपरीबुद्रुक, कुरूंदवाडी. कवठेमहाकांळ-लोणारवाडी, जाखापूर, केरेवाडी, कुंडलापूर, वाघोली, घाटनांद्रे, चुडेखिंडी, अलकुडएस, रांजणी. खानापूर- हिवरे, पळशी, ताडाचीवाडी, बेणापूर, करंजे. तासगाव-लोकरेवाडी, वडगाव.

मंजूर खेपा कागदोपत्रीच

दरम्यान, एका बाजुला दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पाण्याची मागणी वाढतच असताना दुसऱया बाजूला टँकर चालकांकडून मंजूर खेपा टाकल्या जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तशा तक्रारी टँकर सुरू असलेल्या गावांतून केल्या जात आहेत. आठ-आठ दिवस पाण्याचा टँकर येत नाही. या कालावधीत पाणी कोठून आणायाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या 61 गावे आणि 380 वाडय़ावस्त्यांना 147 खेपा मंजूर आहेत. मात्र अनेक ठिकाणी याप्रमाणे खेपा टाकल्या जात नाहीत. कागदोपत्री खेपा टाकल्याचे दाखवून बिले काढण्याचा उदयोग सुरू असून संबंधित विभागाने याची चौकशी करण्याची मागणी ग्रामीण भागातून जनतेतून केली जात आहे.

 

 

Related posts: