|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तब लडे थे गोरोंसे, अब लडेंगे चोरोंसे!

तब लडे थे गोरोंसे, अब लडेंगे चोरोंसे! 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा एल्गार

वार्ताहर/ राजापूर

केंद्र व राज्यातील युती शासनाने विकासाच्या नावाखाली विनाश करण्याचे धोरण अवलंबिले आहे. विकासाची मोठ-मोठी स्वप्ने दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार रोजगार, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा अशा सर्वच बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी जसे सर्वांनी मिळून इंग्रजांना या देशातून हाकलून लावले, तसेच आता या युती शासनाला हाकलून देण्याची वेळ आली आहे. ‘तब लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे’ अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी युती शासनावर हल्ला चढविला.         

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंघर्ष यात्रा मंगळवारी राजापूरात दाखल झाली. त्यावेळी आयोजित सभेत चव्हाण यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राजापूर शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर झालेल्या या  सभेला व्यासपीठावर खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, अमर राजुरकर, भाई जगताप, हुस्नबानू खलिफे, प्रवक्ते हरीष रोग्ये, सचिन सावंत, अल्पसंख्यांक विभागाचे माजी अध्यक्ष जाकीर हुसने, माजी आमदार सुभाष चव्हाण, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, तालुकाध्यक्ष भास्कर सुतार, नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे आदी मान्यवर उपस्थित होते.  

युती शासनाने केवळ मोठ-मोठय़ा घोषणा केल्या, प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या रोखण्यात युती शासन अपशयी ठरले आहे. आज राज्यावर 5 लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे, अशी दुर्दैवी अवस्था या शासनाने करून ठेवल्याची टीका चव्हाण यांनी केली. 

कोकण भकास करण्याचा डाव

कोकणात रिफायनरीसारखे प्रकल्प आणून कोकण भकास करण्याचा प्रयत्न या शासनाचा आहे. प्रकल्पा विरोध करणाऱया शिवसेनेचाही त्यात सहभाग असल्याचे सांगत शिवसेना ही बोगस पार्टी असल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

‘नाणार नाही होणार’ अशी घोषणा सेनेचे पक्षप्रमुख करतात, सेनेचे उद्योगमंत्री अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करतात आणि त्याचवेळी मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच असल्याचे सांगतात. यावरून युती सरकारच्या धोरणातील विसंगती लक्षात येते. कोकणातील पर्यावरणाचा ऱहास करून येथील शेतकरी, बागायतदार, मच्छीमारांना उध्वस्त करण्याचा डाव राज्यशासनाचा आहे. मात्र काँग्रेस येथील जनतेच्या बाजूने ठाम उभी आहे. याठिकाणचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून राज्यात आणि देशात काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सभेसाठी उपस्थित जनसमुदाय पाहून अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त करताना राजापूरातील बदलत्या परिस्थितीची ही नांदी असल्याचे सांगितले.

यावेळी नसीम खान यांनी युती शासनाच्या काळात देशाचा, राज्याचा, जिल्हय़ाचा आणि तालुक्याचा विकास झाला का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’च्या नावाखाली सरकारने स्वतःचा विकास केला आणि सर्वसामान्य जनतेला विनाशाकडे लोटले आहे. जनतेशी गद्दारी करणाऱयांना या निवडणुकीत हद्दपार करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोकणावर सरकारची वक्रदृष्टी

आमदार खलिफे यांनी कोकणावर युती शासनाची वक्रदृष्टी असून मच्छीमार आणि बागायतदारांना देशोधडीला लावण्याचे काम शासन करत असल्याचा आरोप केला. तर अविनाश लाड यांनी कोकणी माणूस रस्ता, पाणी, वीज, रोजगार यासाठी संघर्ष करत असून या संघर्ष यात्रेमुळे आता हा संघर्ष संपुष्टात येणार असल्याचे सांगितले. यावेळी हरीष रोग्ये, भाई जगताप यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सागवे परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.