|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्चस्व अबाधित राखण्यासाठी भारत सज्ज

वर्चस्व अबाधित राखण्यासाठी भारत सज्ज 

यजमान न्यूझीलंडविरुद्ध दुसरी वनडे आज

माऊंट माँगनुई / वृत्तसंस्था

पहिल्या वनडेत दणकेबाज विजय संपादन केल्यानंतर यजमान न्यूझीलंडविरुद्ध तीच वर्चस्वाची मालिका आज (शनिवार दि. 26) दुसऱया वनडेतही कायम राखण्याचा भारतीय संघाचा निर्धार असणार आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर पहिल्या सामन्याप्रमाणेच येथेही भारतीय फिरकी गोलंदाजांचा चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.30 वाजता लढतीला प्रारंभ होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या 1-0 फरकाने आघाडीवर आहे.

यापूर्वी बुधवारी नेपियरमध्ये संपन्न झालेल्या पहिल्या वनडेत जलद गोलंदाज मोहम्मद शमीने भेदक स्पेल टाकल्यानंतर कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांनी न्यूझीलंड संघाची अक्षरशः दाणादाण उडवली. या उभयतांनी त्यावेळी एकत्रित 6 बळी घेतले होते. त्यानंतर किवीज फलंदाजांचे तंत्र आणखी एकदा उघड पाडण्याचा त्यांचा येथे प्रयत्न असणार आहे. भारतीय संघ विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मध्यफळीतील क्रम अद्याप निश्चित करु शकलेला नाही. पण, तरीही पहिल्या लढतीनंतर तातडीने संघात व्यापक फेरबदल केली जाण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते.

प्रशासक समितीने निलंबन तात्पुरते मागे घेतल्यानंतर हार्दिक पंडय़ा संघात दाखल होण्यासाठी न्यूझीलंडला रवाना झाला आहे. पण, तो तिसऱया वनडेपासूनच उपलब्ध असेल, हे जवळपास निश्चित आहे. यापूर्वी, मॅक्लियन पार्कवर भारताने अष्टपैलू विजय शंकरला खेळवले होते. येथे बदल म्हणून रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. बुधवारी 23 चेंडूत नाबाद 13 धावा जमवणाऱया अम्बाती रायुडूला येथे नव्याने स्वतःला आजमावता येईल. वास्तविक, ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याला फारशा धावा जमवता आल्या नव्हत्या. पण, तरीही त्याचे संघातील स्थान अबाधित राहिले आहे.

पहिल्या वनडेत शिखर धवनला फॉर्म मिळाला, ही भारतीय संघासाठी दिलासा देणारी बाब ठरली. डावखुऱया धवनने तेथे 75 धावांचे योगदान देत संघाच्या एकतर्फी विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार विराट कोहलीने देखील धवनच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला होता. ‘धवनची ही अर्धशतकी खेळी संघासाटी बरीच महत्त्वाची आहे. या खेळीमुळे त्याचे मनोबल उंचावेल आणि यामुळे भविष्यात तो आणखी मोठे डाव साकारु शकतो’, असे विराट त्यावेळी म्हणाला होता.

न्यूझीलंडविरुद्ध 5 वनडे सामन्यांच्या या मालिकेत विराट कोहली तिसऱया सामन्यापासून उपलब्ध नसेल. त्यानंतर संघात बरेच बदल अपेक्षित असतील. त्यावेळी शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळू शकते. भारतीय संघाने यापूर्वी न्यूझीलंडचा दौरा केला, त्यावेळी किवीजनी 4-0 असा एकतर्फी दणकेबाज विजय संपादन केला होता. पण, येथे पहिल्याच सामन्यात यजमान संघाला धक्का दिला असून 4 वर्षांपूर्वीचा संघ व सध्याचा संघ यातील फरकच जणू भारतीय संघाने अधोरेखित केला आहे.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, मार्टिन गुप्टील, कॉलिन डे ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेन्री निकोल्स, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, ईश सोधी, मिशेल सॅन्टनेर, टीम साऊदी.

सामन्याची वेळ : सकाळी 7.30 पासून.

बॉक्स

धवन म्हणतो, युवा खेळाडूंमुळे जागा टिकवण्यासाठी बरीच रस्सीखेच!

पृथ्वी शॉ, शुभमन गिल यांच्यासारख्या युवा खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय पटलावर आगमन झाल्यानंतर संघातील जागा टिकवण्यासाठी कधी नव्हे इतकी रस्सीखेच रंगत आली आहे, असे प्रतिपादन सलामीवीर शिखर धवनने दुसऱया सामन्याच्या पूर्वसंध्येला पेले. पृथ्वी शॉने ऑक्टोबरमध्ये कसोटी पदार्पण केले तर शुभमन गिल सध्या सुरु असलेल्या मालिकेत वनडे पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर धवन बोलत होता. युवा खेळाडू प्रचंड वेगाने परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास करणारे असल्याने या स्पर्धेची धग आम्हा सर्वांना जाणवत आहे, असे धवन याप्रसंगी म्हणाला.

‘भारतीय क्रिकेटमध्ये विशेषतः युवा खेळाडू अधिक जलदतेने प्रगल्भ होत आले आहेत आणि यामुळे प्रत्येक जागेसाठी प्रचंड रस्सीखेच सुरु झाली आहे. कोणालाही आपली जागा गृहित धरता येणार नाही, अशी परिस्थिती असून एका अर्थाने दर्जेदार खेळाडूंच्या उपलब्धतेचे हे उत्तम संकेत मानायला हवेत, असे त्याने पुढे नमूद केले. ‘पृथ्वी शॉ संघात आला आणि त्याने विंडीजविरुद्ध शतक झळकावले, नंतर 70 धावांची आतषबाजी केली व यामुळे आपले राखीव फलंदाजही दर्जेदार आहेत, हे दिसून आले. 15 सदस्यीय संघात बरीच गुणवत्ता असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले’, असे धवन यावेळी म्हणाला.

स्वतः धवन अलीकडील कालावधीत फारसा फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत त्याची बॅट अजिबात तळपली नाही. पण, यजमान न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 75 धावांची खेळी साकारली, ही त्याच्यासाठी मनोबल उंचावणारी बाब ठरु शकेल. या खेळीदरम्यान त्याने 5 हजार धावांचा टप्पा सर केला.

ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेतील खराब फॉर्मच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्ध रणनीती, तंत्रात काही बदल केले का, या प्रश्नावर धवन म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील वातावरण जवळपास समसमान आहे. माझ्या पाठीशी अनुभव असल्याने ही जमेची बाजू ठरु शकते. कारण, काही वर्षांपूर्वी मी येथे खेळलो आहे आणि नेमके काय बदल करावे लागतात, याची मला कल्पना आहे. माझ्या मते माझी शैली सर्व प्रकारच्या खेळपट्टीशी जुळवून घेऊ शकणारी आहे. पहिल्या वनडेत जशी फटकेबाजी केली, त्याचीच पुनरावृत्ती उर्वरित मालिकेतही करण्याचा माझा प्रयत्न असेल’.