|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विष्णू नागले यांना राष्ट्रपतींकडून ‘पोलीस पदक’

विष्णू नागले यांना राष्ट्रपतींकडून ‘पोलीस पदक’ 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस फौजदार विष्णू गोपाळ नागले यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती, भारत सरकार यांच्याकडून ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या पदकासाठी एकूण 3 वरिष्ठ अधिकारी व 1 पोलीस कर्मचारी यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी नागले यांची निवड झाली आहे.

विष्णू नागले हे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात 15 नोव्हेंबर 1983 रोजी भरती झाले असून त्यांनी यापूर्वी पोलीस मुख्यालय, देवरुख पोलीस ठाणे, लांजा पोलीस ठाणे, संगमेश्वर पोलीस ठाणे या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले. सध्या ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी काम केलेल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला अतिशय चांगल्या प्रकारे कार्यालयीन कामकाज केले असून क्राईम रायटर म्हणूनही प्रशंसनीय काम केले आहे.

पोलीस दलात काम करत असताना नागले यांनी गुन्हे अभिलेख उत्तम प्रकारे व आपले सुवाच्छ अक्षरात ठेवून वेळोवेळी मुदतीत अद्ययावत केले आहेत. याशिवाय त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांना गुन्हे शोध, गोपनीय माहिती संकलन, समाजविघातक घटकांविरुध्दची कारवाई, अतिमहत्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त या बाबतीत उत्कृष्ठ प्रकारे मदत केली आहे. त्यांचा जनता संपर्क अतिशय चांगला असून कर्तव्याप्रती उत्कृष्ठ निष्ठा असलेले नागले यांनी आपल्या प्रदीर्घ 35 वर्षाच्या सेवाकालावधीत कठोर मेहनत घेवून आपले कर्तव्य पार पाडले आहे. नागले यांच्या या कामगिरीची दखल घेवून यापूर्वी त्यांना सन 2011 मध्ये गुणवत्तापूर्व सेवेबद्दल राष्ट्रपती यांच्याकडून ‘पोलीस पदक’ व सन 2012 मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून ‘सन्मानचिन्ह’ देवून गौरवण्यात आले आहे. नागले यांनी आपले पोलीस दलातील कर्तव्यकाळात चांगले कामगिरीकामी एकूण 257 बक्षिसे प्राप्त केली आहेत. 

 सहाय्यक पोलीस फौजदार नागले यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती महोदय यांच्याकडून ‘पोलीस पदक’ प्राप्त झाले असून ही बाब रत्नागिरी जिल्हा पोलीस दलास निश्चितच भूषणावह आणि गौरवास्पद आहे, अशा शब्दात स.पो.फौ. नागले यांचे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (गृह) महादेव वावळे, शिरीष सासने, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्यासह जिल्हय़ातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

Related posts: