|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेल्वेरुळात बिघाड : अपघात टळला

रेल्वेरुळात बिघाड : अपघात टळला 

बेळगाव / प्रतिनिधी

शहरानजीक रेल्वे रुळात बिघाड झाल्याने धोका निर्माण झाला होता. मात्र मोटारमन आणि रेल्वे कर्मचाऱयांच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला. यामुळे रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शुक्रवारी सकाळच्या वेळेस चौथ्या रेल्वे गेटनजीक मजगावजवळ रेल्वे रुळ सरकल्याने हा धोका निर्माण झाला होता.

सकाळी कॅसलरॉक येथून मिरजला जाणारी पॅसेंजर रेल्वे 7.30 च्या सुमारास या मार्गावरून येत असताना मोटारमन आणि रेल्वे कर्मचाऱयांच्या नजरेस रेल्वे रुळात बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यांनी संभाव्य धोका ओळखून रेल्वे थांबविली. तसेच रेल्वेच्या कर्मचाऱयांनी सरकलेले रुळ पुन्हा बसविले. यामुळे कॅसलरॉक-मिरज पॅसेंजर रेल्वे या ठिकाणी सुमारे 20 मिनिटे थांबून राहिली. याबरोबरच काही रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडले. रेल्वे कर्मचारी तसेच मोटारमन यांनी लागलीच दक्षता घेतल्याने रेल्वेचा संभाव्य अपघात टळला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत होते.