|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सातार्डा येथे वृद्धाचा मृतदेह आढळला

सातार्डा येथे वृद्धाचा मृतदेह आढळला 

सातार्डा / वार्ताहर:

सातार्डा-तरचावाडा येथील मूळ रहिवासी व सध्या पेडणे-गडेकर भाटले येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त शिक्षक अनंत राजाराम बागकर (72) हे मंगळवारी सकाळी सातार्डा-न्हयबाग पुलांच्या पायऱयाजवळ मृतावस्थेत आढळून आले. याची तक्रार मुलगा अवधुत बागकर यांनी पोलीस दूरक्षेत्रात दिली.

अनंत बागकर हे सध्या पेडणे येथे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्याला आहेत. त्यांची सातार्डा-तरचावाडा येथे नारळाची बाग आहे. या बागेतील नारळ काढण्यासाठी बागकर हे सोमवारी गेले होते. मात्र, सायंकाळीपर्यंत वडील घरी आले नसल्याने नातेवाईक व स्थानिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नव्हते. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सातार्डा-न्हयबाग पुलाच्या पायऱयांजवळ वृद्धाचा मृतदेह ग्रामस्थांना दिसून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदानंद साळुंखे, पोलीस नाईक उत्तम वंजारे यांनी घटनास्थळी जात मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

सातार्डा-न्हयबाग येथे वृद्धाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच बागकर यांचा मुलगा अवधुत यांनी घटनास्थळी धाव घेत सदरचा मृतदेह अनंत बागकर यांचा असल्याचे स्पष्ट केले. सातार्डा-तरचावाडा येथील नारळ बागेत जात असताना पुलाच्या पायऱयांवरून जाताना तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. मृतदेहाचा पंचनामा करून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अरुण सावंत, अमित गोते यांनी घटनास्थळी भेट दिली. बागकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.