|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अधिवेशनात पोलीस बंदोबस्तासाठी 2 कोटी 90 लाख 92 हजार खर्च

अधिवेशनात पोलीस बंदोबस्तासाठी 2 कोटी 90 लाख 92 हजार खर्च 

बेळगाव / प्रतिनिधी

डिसेंबर 2018 मध्ये बेळगावात पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचे वास्तव्य, प्रवास आणि जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच अन्य खर्चासाठी सरकारकडून 3 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले होते. यापैकी एकूण 2 कोटी 90 लाख 92 हजार 286 रुपये खर्च झाले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून खर्चाचा तपशील दिला आहे.

पोलीस कर्मचाऱयांच्या जेवणाचा खर्च 1 कोटी 75 लाख 51 हजार 214 रुपये, अधिवेशनानिमित्त सुवर्ण विधानसौध तसेच आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी केलेला खर्च 22 लाख 29 हजार 875, पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी निर्माण केलेल्या मंडपाचा खर्च 18 लाख 78 हजार 973, पोलीस कर्मचाऱयांना सुवर्णसौधकडे येण्या- जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या परिवहन खात्याच्या बसचे भाडे 47 लाख 7 हजार 228 आणि अन्य 27 लाख 24 हजार 996 असे एकूण 2 कोटी 90 लाख 92 हजार 286 इतका खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

2017 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी 3 कोटी 34 लाख 59 हजार 877 इतका खर्च झाला होता. 2018 च्या हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकारच्यावतीने 3 कोटी 50 लाख रुपये अनुदान मंजूर केले होते. यापैकी 2 कोटी 90 लाख 92 हजार 286 रुपये खर्च झाले आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा 44 लाख रुपये शिल्लक राहिले आहेत. याबरोबरच अतिरिक्त 15 लाख रुपयांसह शिल्लक राहिलेले एकूण 69 लाख 7 हजार 714 रुपये इतके अनुदान सरकारला परत पाठविले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.