|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उत्तर भारतात विषारी दारूचे 40 बळी

उत्तर भारतात विषारी दारूचे 40 बळी 

उत्तरप्रदेश, उत्तराखंड येथील दुर्दैवी प्रकार : 22 कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूचे प्राशन केल्यामुळे 40 जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमध्ये 10, सहारनपूरमध्ये 18 आणि उत्तराखंडच्या रुडकीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 24 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये या घटनेप्रकरणी पोलीस आणि अबकारी विभागाच्या 22 कर्मचाऱयांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. पीडितांनी स्पिरिटद्वारे तयार करण्यात आलेल्या मद्याचे सेवन केले होते, असा आरोप लोकांनी केला आहे.

कुशीनगरमध्ये मंगळवारी रात्री विषारी दारूच्या प्राशनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला होता. या लोकांनी गावाबाहेर निर्माण केल्या जाणाऱया अवैध दारूचे सेवन केले होते. यानंतर मागील 72 तासांमध्ये मद्यसेवनामुळे प्रकृती बिघडलेल्या आणखी 7 जणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्हाधिकारी अनिल कुमार सिंग आणि पोलीस अधीक्षक राजीव नारायण मिश्रा समवेत अनेक अधिकाऱयांनी गावात धाव घेतली आहे. पोलीस आणि अबकारी विभागाच्या संगनमताने स्पिरिटचा वापर करत मोठय़ा प्रमाणावर दारूची निर्मिती होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी क्षेत्रीय अबकारी निरीक्षक एच. एन. पांडे आणि अन्य कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तर संबंधित पोलीस स्थानकाचे प्रमुख विनय कुमार पाठक यांच्यासह 3 पोलीस कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

हरिद्वारमध्ये विषारी दारूचे थैमान

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये विषारी दारूने 12 बळी घेतले आहे. बालुपूर गावात एका सामूहिक भोजनानंतर दारू पिणाऱया अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर 4 जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरात तयार करण्यात आलेल्या कच्च्या दारूच्या सेवनामुळे ही घटना घडल्याचा दावा उत्तराखंडचे अबकारी मंत्री प्रकाश पंत यांनी केला आहे.