|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा 

दुखापतीतून सावरलेल्या मार्टिन गुप्टीलचे पुनरागमन, बुधवारी पहिली वनडे

वृत्तसंस्था/ ऑकलंड

बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेसाठी शनिवारी 14 सदस्यीय न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. भारताविरुद्ध टी-20 मालिकेत दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या स्टार खेळाडू मार्टिन गुप्टीलचे किवीज संघात पुनरागमन झाले आहे. उभय संघात तीन वनडे व तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने दिली.

भारत व न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिके दरम्यान मार्टिन गुप्टीलच्या कंबरेला दुखापत झाल्यामुळे त्याला मालिकेला मुकावे लागले होते. दरम्यान, तो या दुखापतीतून सावरला असल्यामुळे बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघात स्थान दिले असल्याचे न्यूझीलंड मंडळाचे निवड समिती सदस्य गेविन लार्सन यांनी सांगितले. अनुभवी केन विल्यम्सनकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली असून संघात टॉड ऍस्टल व मिचेल सॅन्टेनर या दोन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे बदल वगळता भारताविरुद्ध मालिकेतील संघ कायमच ठेवण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

न्यूझीलंड व बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. उभय संघातील दुसरा सामना ख्राईस्टचर्च येथे 16 रोजी तर तिसरा सामना डय़ुनेडिन येथे 20 रोजी खेळवण्यात येणार आहे. यानंतर, दोन्ही संघात तीन सामन्यांची कसोटी खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना दि. 28 फेब्रुवारी रोजी हॅमिल्टन येथे, दुसरा सामना 8-12 मार्च दरम्यान वेलिग्ंटन येथे तर तिसरा सामना 16-20 मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे.

न्यूझीलंड वनडे संघ – केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन ग्रँडहोम, ल्युक फर्ग्युसन, मार्टिन गुप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, मिचेल सॅन्टेनर व टीम साऊथी.

 

Related posts: