|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कलियुगातील महाभारत

कलियुगातील महाभारत 

महाभारत हे एक अजरामर काव्य आहे. त्याचे अनेक पोटभेद आणि पाठभेद आहेत. नुकतीच आम्हाला त्याची नवी आवृत्ती सापडली असून त्यात कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या आधीच्या काही घटनांचे वर्णन आहे. ते इथे देत आहोत.

कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध करायचे ठरले. दोन्ही बाजूंनी सैन्याची जमवाजमव सुरू झाली. कर्णाने दुर्योधनापाशी हट्ट धरला की माझ्या रथाचे सारथ्य शल्याने करावे. दुर्योधनाने तो मान्य केला. शल्यदेखील कर्णाचे सारथ्य करायला कसाबसा राजी झाला. शहरांमध्ये विविध उत्सवांच्या आधी महिनाभर ढोलपथके सराव करतात, क्रिकेटच्या सामन्यांपूर्वी खेळाडू नेट प्रॅक्टिस करतात, किंवा साहित्य संमेलनापूर्वी साहित्यिक किंवा महामंडळातले रिकामे लोक वादावादी करतात, तसे अनेक योद्धे शरसंधान, गदायुद्ध वगैरेचा सराव करू लागले.

कर्णाच्या लक्षात आले होते की महाभारताच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये युद्ध सुरू असताना शल्य आपला मानभंग करतो, मग आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि अर्जुनाबरोबरच्या युद्धात आपण हरतो. म्हणून त्याने एके दिवशी शरसंधानाचा सराव करायला शल्याला सोबत घेतले. रथात बसून दोघे दूर गेले. मृत्युंजय कादंबरीमध्ये आपल्या पराक्रमाचे केलेले वर्णन कर्णाने शल्याला वाचून दाखवले. शल्याने कर्णाला इरावतीबाईंच्या लेखनातले अंश सुनावले. विराटावर हल्ला केला तेव्हा आणि यक्षाने कौरवांना जेरबंद केले तेव्हा अर्जुनच कर्णाला भारी पडला होता याची आठवण करून दिली. तेव्हा कर्णाची चिडचिड झाली. 

“शल्यराज, तू नेहमी माझा अपमान का करतोस?’’

“मी सत्यवक्ता आहे. माझ्या परिवारातले लोक ज्या पक्षात आहेत त्या पक्षाविषयी मला सहानुभूती आहे.’’

“आत्ता द्वापारयुग आहे ते ठीक आहे. पुढे कलियुग आले की या खरे बोलण्याला किंमत उरणार नाही.’’

“मी तुला शाप देतो. कलियुगात तू कचोऱया, सांबारवडय़ा, वडाभातसारखे पदार्थ चवीने खाणारा खवय्या म्हणून प्रसिद्ध होशील. पण तुझ्या जवळचे लोक तुझ्या स्पष्टवक्तेपणाची धास्ती घेतील.’’

“कर्णा, माझे चुकले. मला उःशाप दे.’’

“ठीक आहे. तू स्पष्टवक्ता जरी असलास तरी तुझे सर्व पक्षातील लोकांशी चांगले संबंध राहतील. तू सर्वांमध्ये लोकप्रिय असशील.’’

“मला हस्तिनापुरच्या गादीवर बसायला मिळेल का?’’

यावर कर्णाने काय उत्तर दिले त्याची नोंद सापडत नाही.

Related posts: