|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » राहुल यांच्या मनात मोदींबद्दल द्वेष!

राहुल यांच्या मनात मोदींबद्दल द्वेष! 

रुण जेटलींचा शाब्दिक हल्ला : विरोधकांची विश्वासार्हता संपली

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

अमेरिकेत उपचार करवून घेतल्यावर भारतात परतलेले केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी समाजमाध्यमांद्वारे काँग्रेस तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला आहे. रविवारी केलेल्या काही ट्विट्समध्ये जेटलींनी राफेल,  जीएसटी, सर्जिकल स्ट्राइक, गोहत्या वाद इत्यादी मुद्यांचा उल्लेख केला. त्यांनी राहुल यांना अप्रत्यक्षरित्या वर्गात पहिला आलेल्याबद्दल असूया असणारा नापास विद्यार्थी ठरविले आहे.

मागील काही महिन्यांपासून काँग्रेस बनावट आंदोलन चालवून सरकारला बदनाम करत आहे. असत्य अधिक काळ टिकू शकत नाही. राफेलचा व्यवहार भारताची लढाऊ क्षमता वाढविणारा आहे. तसेच या व्यवहारामुळे देशाचे कोटय़वधी रुपये वाचले आहेत. याप्रकरणी विरोधकांनी अपुरे पत्र दाखविल्याने त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. सत्याचा नेहमी विजय होतो याचा विरोधकांना विसर पडला होता, असे उद्गार जेटलींनी काढले आहेत. राफेलबद्दल राहुल यांची दोन विधाने ऐकल्यास ते पंतप्रधान मोदींसोबतचे वैयक्तिक शत्रुत्व निभावत असल्याचे समजून येईल. एक अनुत्तीर्ण विद्यार्थी वर्गात पहिल्या येणाऱयाचा नेहमीच द्वेष करत असतो, अशी टिप्पणी जेटलींनी केली आहे.

फरार, मध्यस्थांना परत आणले

2008-2014 दरम्यान बँकांना लुटणारेच आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही एक रुपयाचे देखील कर्ज माफ केलेले नाही. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळय़ात सामील ख्रिस्तियन मिचेलला भारतात आणणे सरकारचे मोठे यश आहे. अनेक थकबाकीदार तसेच मध्यस्थांना देशात परत आणले गेल्याने विरोधकांचे असत्य चव्हाटय़ावर आल्याचे जेटली म्हणाले.

सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख

सरकार आणि भाजप नेहमीच सैन्यासोबत उभा आहे. विरोधकांनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल संशय व्यक्त केला होता. तसेच विरोधकांनी सैन्यप्रमुखांना गुंड संबोधिल्याचा आरोप जेटलींनी केला आहे.

Related posts: