|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागलमधील प्रलंबीत दूधगंगा डाव्या कालव्याच्या कामाला अखेर मुहूर्त

कागलमधील प्रलंबीत दूधगंगा डाव्या कालव्याच्या कामाला अखेर मुहूर्त 

प्रतिनिधी/ कागल

दूधगंगा धरणाच्या डाव्या कालव्याचे कागलमधील प्रलंबीत रहिलेले काम चार दिवसापूर्वी सुरु झाले आहे. या कालव्याचे काम बंद पडून सुमारे 15 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटाला आहे. पाझर तलाव ते नगरपालिकेच्या घनकचरा              प्रकल्पापर्यंत कालव्याचे काम येवून ठेपले होते. 15 वर्षानंतर का असेना दूधगंगा कालव्याच्या कामास अखेर मुहूर्त सापडला. येत्या सहा महिन्यात या कालव्यातून पाणी वाहणार आहे.

दूधगंगा नदीवर काळम्मावाडी येथे 1974 साली धरणाच्या बांधकामाचा शुभारंभ झाला होता. या धरणातून डावा आणि उजवा कालवा असे दोन कालवे काढून त्यापैकी उजव्या कालव्यातील पाणी कर्नाटकसाठी तर डाव्या कालव्यातून पाणी कुरुंदवाडपर्यंत जाणार होते. प्रत्यक्ष कालवा खुदाईच्या कामाला 1990 च्या दशकात सुरुवात झाली. डाव्या कालव्याच्या खुदाईचे काम पी. व्यंकू रेड्डी यांच्याकडे होते. दिंडनेर्ली येथेपर्यंत कालव्याची खुदाई झाल्यानंतर शेतकऱयांच्या जमिनीचे पुनर्वसन न झाल्याने या ठिकाणी शेतकऱयांनी काम बंद पाडले होते. सध्या त्या ठिकाणचे कालव्याचे काम हे जवळपास पूर्ण झाले आहे. कागल येथे पाझर तलावापर्यंत या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. आता बोटींग क्लब ते घनकचरा प्रकल्पापर्यंतच्या कालवा खुदाईचे काम आठ दिवसांपासून सुरु झाले आहे. पाझर तलावाजवळ बंधाऱयाला समांतर अशी सिमेंट काँक्रीटची भींत तयार करुन त्यातून पाणी पुढे जाणार आहे.

सध्या युरोटेक्स कंपनीच्या जागेत खुदाईचे काम सुरु असून तेथून ते घनकचरा प्रकल्पाजवळ पूर्वी खुदाई केलेल्या कालव्याला मिळाल्यानंतर हे खुदाईचे काम पूर्ण होणार आहे. यापूर्वी कुरुंदवाडपर्यतच्या कालवा खुदाईचे काम पूर्ण झाले आहे.       प्रलंबीत मधल्या टप्प्याचे काम सहा महिन्यात पूर्ण होणार असून येत्या सहा महिन्यात या कालव्यातून पाणी वाहताना दिसणार आहे.

माजी पाटबंधारे मंत्री स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यकालात कालव्याच्या कामाला चांगली गती मिळाली होती. त्यानंतर माजी जलसंपदा मंत्री, विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी का कालव्यासाठी खास निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यामुळे दोन्ही कालव्यांचे काम बरेचसे पूर्ण झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून डाव्या कालव्याच्या खुदाईचे काम युरोटेक्स कंपनीने घेतलेल्या जागेत सुरु आहे. या कालव्याची रुंदी 20 मीटर इतकी असून तितक्याच खोलीच्या या कालवा खुदाईचे काम आता सुरु झाले आहे. सध्या या कालवा खुदाईचे काम कोल्हापूर येथील कंपनीला दिले असल्याचे समजते. कामाच्या ठिकाणी मोठय़ा क्षमतेचे जेसीबी मशिनद्वारे कामाला सुरुवात झाली आहे. हा कालवा पाझर तलावाच्या जवळून जात असल्याने पाझर तलावाच्या बंधाऱयाच्या खालच्या बाजूस बंधाऱयासारखीच मोठी सिमेंट काँक्रीटची भिंत बांधून त्यातून हे पाणी पलिकडे नेले जाणार आहे. या कालव्याच्या खुदाईचे काम बोटींग क्लब ते घनकचरा प्रकल्पापर्यंतचे अपूर्ण राहिलेले काम सध्या सुरु आहे.

Related posts: