|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वृद्धेच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

वृद्धेच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप 

वेळगिवेत दागिन्यांच्या मोहापायी केला होता खून : घटनेनंतर आरोपी होता फरार

प्रतिनिधी / ओरोस:

 आपल्याच नात्यातील एका 75 वर्षीय वृद्धेला सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापायी कोयत्याने वार करून ठार मारण्याप्रकरणी देवगड तालुक्यातील नाद गावठाण येथील आरोपी मुकेश राजू साटम (25) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी जन्मठेपेसह 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहिले.

सुमित्रा वामन दळवी (मयत) ही मुटाट पाळेकरवाडी येथील महिला वेळगिवे गावठाण येथील आपला भाऊ सदानंद लाड याच्या घरी (माहेरी) शेतीच्या कामाच्या मदतीसाठी गेली होती. यावेळी त्या ठिकाणी मुकेश राजू साटम हा लाड कुटुंबियांचा नातेवाईकही तेथे आला होता. 27 जून 2017 रोजी सायंकाळी लाड कुटुंबीय शेतातील कामासाठी गेले होते. यावेळी सुमित्रा ही वृद्धा आणि मुकेश घरी थांबले होते. याच दरम्यान मुकेश याने तिच्या मानेवर कोयत्याने वार केला होता. यात ती रक्तबंबाळ झाली. मुकेश याने तिच्या अंगावरील आणि घरातील मिळून 1 लाख 16 हजाराच्या सोन्याचा दागिन्यांसह पोबारा केला होता. यामध्ये मयत महिलेच्या गळ्य़ातील सोन्याची माळ, तर घरातील सोन्याचे मंगळसूत्र, नथ, अंगठी, छत्री व रोख 1000 रुपये आदीचा समावेश होता.

सायंकाळी शेतातून परत आलेल्या सदानंद यांचा मुलगा प्रल्हाद याला सुमित्रा ही घरातच रक्ताच्या थारोळय़ात पडलेली दिसली. तिला दवाखान्यात नेण्यात आले. नंतर बांबोळी (गोवा) येथे हलविण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना 28 जून 2017 रोजी तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान प्रल्हाद लाड यांच्या फिर्यादीनुसार विजयदुर्ग पोलिसांनी आरोपी मुकेश साटम याच्यावर भा. दं. वि. कलम 302, 397, 394 नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा घडल्यापासून फरार झालेल्या आरोपीला पोलीस पथकाने 2 जुलै 2017 रोजी मुंबई येथून ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडे चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी नथ मिळून आली होती. तर अन्य मुद्देमाल पोलिसांनी त्यानंतर हस्तगत केला होता.

जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत एकूण 22 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी प्रल्हाद लाड आणि घटनेनंतर बाहेर जाताना बघितले असलेल्या साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली. तपासिक अंमलदार म्हणून विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे तत्कालिन प्रभारी पोलीस निरीक्षक ए. पी. आय. अमोल चव्हाण यांनी काम पाहिले. सध्या ते काणकवली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वाचक पदावर कार्यरत आहेत. तसेच हेड कॉन्स्टेबल राजन जाधव, पोलीस नाईक गुणिजन, मनोज साळवी, तांबे, संदीप पाटील तसेच उपविभागीय कार्यालय कणकवलीचे पोलीस हवालदार करंगुटकर, पोलीस नाईक राकेश कडुलकर तसेच कोर्ट कामकाज पाहणीत पीएसआय नावाडकर, पोलीस हवालदार मल्लिकार्जुन ऐहोळे, बिर्जे, नाईक यांनी तपासात मोलाची कामगिरी बजावली.

आरोपीला भा. दं. वि. 302 अंतर्गत आजन्म कारावास आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने जादा साधा कारावास आणि कलम 394 आणि 397 अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने जादा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही वस्तुस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोप सिद्ध करण्याची साखळी पूर्ण केली गेली आणि सरकार पक्षाची बाजू ग्राहय़ मानून न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत ऍड. सूर्यकांत खानोलकर यांनी समाधान व्यक्त केले.