|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत रूमानिया उपांत्य फेरीत

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत रूमानिया उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ पॅरीस

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत रूमानिया संघाने प्रथमच उपांत्य फेरीत गाठली आहे. रविवारी झालेल्या लढतीत रूमानियाने विद्यमान विजेत्या झेक प्रजासत्ताकचा 3-2 अशा फरकानी पराभव केला.

रूमानिया आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील लढतीत निर्णायक दुहेरीच्या सामन्यात रूमानियाच्या मोनिका निकुलेस्क्यु आणि इरिना कॅमेलिया बेगु या जोडीने विंबल्डन आणि फ्रान्स ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील महिला दुहेरीचे अंजिक्यपद मिळविणाऱया झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोव्हा आणि कॅटरिना सिनियाकोव्हा यांचा 6-7 (2-7), 6-4, 6-4 असा पराभव केला. हा दुहेरीचा सामना तीन तास चालला होता. झेक प्रजासत्ताकने या स्पर्धेच्या इतिहासात सलग अकराव्यांदा उपांत्य फेरी गाठली होती. गेल्या दशकातील झेकचा हा पहिला पराभव आहे.

महिला एकेरीच्या सामन्यात रूमानियाच्या हॅलेपने झेकच्या प्लिसकोव्हाचा 6-4, 5-7, 6-4 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात झेकच्या सिनियाकोव्हाने रूमानियाच्या बुझारनेस्क्युचा 6-4, 6-2 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली होती. येत्या एप्रिलमध्ये फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना फ्रान्समध्ये खेळविला जाणार असून रूमानियाला फ्रान्सचा दौरा करावा लागेल. रूमानिया आणि फ्रान्स तसेच बेलारूस व ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी उपांत्य लढत होईल.

लिगे येथे झालेल्या लढतीत कॅरोलिना गार्सियाने आपला एकेरीचा सामना जिंकून फ्रान्सला बेल्जियमविरूद्धच्या लढतीत आघाडीवर नेले. गार्सियाने बेल्जियमच्या मर्टन्सचा 6-2, 6-3 असा पराभव केला. या लढतीतील पहिल्या दिवशी गार्सियाने बेल्जियमच्या युटीव्हॅनेकचा पराभव केला होता. फ्रान्सने त्यानंतर दुहेरीचा सामना जिंकून बेल्जियमवर 3-0 अशी एकतर्फी विजयी आघाडी मिळविली.

ऍसव्हिले नॉर्थ कॅरोलिना येथे अन्य एका लढतीत ऑस्ट्रेलियाने अमेरिकेचा 3-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. ऑस्ट्रेलियाने एकेरीचे दोन तर दुहेरीचा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा 6-4, 6-1 असा पराभव केला. त्यानंतर अमेरिकेच्या कॉलिन्सने एकेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गॅव्हेरिलोव्हाचा 6-1, 3-6, 6-2 असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बार्टी आणि हॉन या जोडीने अमेरिकेच्या कॉलिन्स आणि मेलिचेर यांचा 6-4, 7-5 असा पराभव केला.

बेलारूसने जर्मनीवर 3-0 अशी एकतर्फी विजयी आघाडी घेत फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेचे उपांत्य फेरी गाठली. या लढतीतील एकेरीच्या सामन्यात बेलारूसच्या सॅबेलिनेकाने जर्मनीच्या सिगमंडचा 6-1, 6-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीची लढत 20-21 एप्रिलला होणार आहे.

Related posts: