|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सिध्दनेर्लीत आंगणवाडीला एसटी बसचा लूक

सिध्दनेर्लीत आंगणवाडीला एसटी बसचा लूक 

 

वार्ताहर /  सिध्दनेर्ली 

येथे नवीनच बांधलेल्या अंगणवाडीला एसटी बसचा लूक देऊन आकर्षक अशी रंगसंगती करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्यावतीने केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे या अंगणवाडीची चर्चा सर्वत्र होत आहे .

ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग महिला व बालकल्याण विभाग यांच्या सहकार्यातून सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ या नवीन अंगणवाडय़ांचे बांधकाम करण्यात आले आहे. या अंगणवाडय़ांच्या इमारती सर्व सोयींयुक्त असून यामध्ये वर्गखोली, किचन,  संडास बाथरूम, स्टोअर रुम अशी व्यवस्था आहे .गेली एकविस वर्षे अंगणवाडय़ांना स्वतःच्या इमारती नसल्याने इतरत्र जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी तसेच समाज  मंदिराच्या ठिकाणी चालू होत्या. इमारती बांधल्या नंतर बाहेरील बाजूस त्याला कल्पकतेने  एसटी बसचा  लूक    दिला आहे.  त्यामुळे त्या ठिकाणी एखादी एसटी थांबली असल्याचा  भास होतो .आतील बाजूस वर्ग खोलीच्या  सर्व भिंती या बोलक्या केल्या  आहेत.  मुलांना सोबत घेऊन येणाया त्यांच्या आईला वाचत बसण्यासाठी विविध पुस्तकांचा संग्रह ठेवण्यात आला आहे.  त्यामुळे अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर पाहिल्यानंतर एक समाधान मिळते. अंगणवाडी क्रमांक 38 व 267 अंगणवाडय़ांमध्ये 50 विद्यार्थी आहेत.  विद्यार्थ्यांमध्ये  शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी दृश्राव्य माध्यमांचे महत्व ओळखून स्वता  अंगणवाडी सेविका , मदतनीस तसेच लोकसहभागातून डिजिटल वर्ग करण्यासाठी एक एलईडी घेऊन त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. सर्वांची धडपड पाहता निश्चितपणे भविष्यात मराठी अंगणवाडी टिकतील व वाढतील यात शंका नाही. अंगणवाडीकडे पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चांगला असून यातूनच मराठी शाळांना चांगले दिवस  येतील. यासाठी माजी सरपंच निता पाटील, सरपंच सुरेखा पाटील, उपसरपंच कबीर कांबळे, प्रा. सुनील मगदूम ,ग्राम विस्तार अधिकारी महिपती  बेनके, वंदना कांबळे, शुभांगी लोहार, मीनाक्षी कांबळे, राजश्री कांबळे यांचे महत्वाचे योगदान आहे.