|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बेरोजगारीवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

बेरोजगारीवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक 

जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक : छेडले निषेध आंदोलन : हायवे कामावरही नाराजी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

वाढती बेरोजगारी आणि महामार्ग प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांवर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. केंद्र व राज्य सरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करीत निषेध आंदोलन करून निवासी उप जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करीत निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित सामंत, उदय भोसले, प्रफुल्ल सुद्रिक, रुपेश जाधव, सावळाराम अणावकर, भास्कर परब, शिवाजी घोगळे, आत्माराम ओटवणेकर, चंद्रकांत पाताडे, रमण वाईरकर आदींसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांतील कार्यकाळात देशातील युवक-युवतींना रोजगार देण्यासंदर्भात केंद्र सरकारची नकारात्मक भूमिका आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड इन इंडिया, प्रधानमंत्री युवा योजनांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर गाजावाजा करून रोजगार निर्माण केला, असे चित्र निर्माण करण्यात आले. परंतु तसे काहीच झाले नाही. केंद्रीय सांख्यिक आयोगातर्फे प्रकाशित होणाऱया अहवालात बेरोजगाराची टक्केवारी ही इतिहासात नोंद होईल एवढी वाढली आहे. त्यामुळे फसव्या योजनांचा पर्दाफाश झाला आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे, याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.

 सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा वाळू लिलाव अद्याप खुला न झाल्याने अनेकांचा रोजगार थांबलेला आहे. एकूणच बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास शासन अपयश ठरल्याने पेंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत असल्याचे सुरेश गवस म्हणाले.

महामार्ग प्रकल्पबाधितांवर अन्याय

 कणकवली तालुक्यातील वागदे गावामध्ये जमीन संपादनाच्या नोटिसा संबंधित खातेदारांना न देता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच बऱयाच ठिकाणी केलेले काम हे निकृष्ट आहे. रस्त्याला तडे गेलेले पाहायला मिळत आहेत. सतत पाणी न मारल्यामुळे प्रवाशांच्या डोळय़ात धूळ जाऊन डोळय़ांचे आजार होऊ शकतात. सर्व्हीस रोडचे काम देखील चांगल्या प्रतीचे नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेला काम योग्य प्रकारे करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी आदेश द्यावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसला आंदोलनचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.