|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पशुवैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार

पशुवैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार 

परळी भागातील पशुधनाचे उपचाराविना होतायत मृत्यु, प्रशासनाकडून प्राण्यांचा सर्व्हे एकदाही नाही

वार्ताहर/ कास

परळी पशुवैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार सुरू असून डोंगर कपारीतील गावांमध्ये ड़ॉक्टरच पोहोचत नसल्याने शेतकऱयांचे पाळीव प्राणी औषध उपचाराविना मरत असून शेतकरी अडचणीत येत आहेत.

परळी पशुवैद्यकीय विभागांतर्गत येत असणाऱया वडगाव बिटामध्ये पेट्री अनावळे, आटाळी, जांभळेघर, वाजंळवाडी, घाटवण, कासाणी, धावली, जुंगटी, तांबी, भांबवली, पाली, पाटेघर, जळकेवाडी, नावली, रोहोट, अलवडी, वेणेखोल या परिसरातील आदी अनेक गावे येत असून या गावातील शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून प्रामुख्याने गाई, म्हैसी, शेळ्या, मेंढया आदी पाळीव प्राणी सांभाळत असून या प्राण्यांना कोणत्याही आजाराची लागण झाल्यास किंवा एखादे जनावर अपघाताने जखमी झाल्यास किंवा लसीकरणासाठी व औषध उपचारासाठी या भागात गेल्या अनेक वर्षांपासून एकही डॉक्टर फिरकत नसल्याने येथील पशुपालन व्यवसायिक शेतकरी अडचणीत येवू लागला आहे.     

    शासन स्तरावरून शेतकऱयांच्या आर्थिक उन्नतीसाठी पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अनेक सवलती देवून प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक विभाग बिटनुसार पशुवैद्यकीय डॉक्टरांची नेमणूक केली जाते. मात्र, हे कामचुकार कर्मचारी भागातील गावामध्ये जावून सेवा देण्यास टाळाटाळ करत असल्याने प्राण्यांना वेळेवर लसीकरण, औषध उपचार मिळत नसल्याने अनेक प्राणी दगावत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. खासगी डॉक्टर आणल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून त्या डॉक्टरांकडे महत्वाच्या लसी व औषधेही उपलब्ध नसतात.

लसीकरणाचे तीनतेरा

पेट्री, कासाणी, धावली या परिसरात पशुधन जास्त प्रमाणात सांभाळले जात असले तरी या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्राण्यांचा सर्व्हे एकदाही झालेला नसून आजाराची लागण होवू नये म्हणून लसीकरणही होत नाही. त्यामुळे
कर्मचाऱयांना कोण सूचना देणार की अधिकारी ऑफीसमध्ये बसून फक्त कागद रंगवत राहणार? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

Related posts: