|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प हटविण्याची मागणी

वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प हटविण्याची मागणी 

प्रतिनिधी / बेळगाव

नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प बंद करण्याचा विचार मनपाच्या आरोग्य खात्याने सुरू केला आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन मनपा आरोग्याधिकाऱयांनी दिले आहे.

बुधवारी दुपारी मनपाच्या पथकाने या कचरा निर्मूलन प्रकल्पाला भेट दिली. पाहणी करून आवश्यक समस्यांचा आढावा घेतला. त्यावेळी येथील नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सदर प्रकल्प त्वरित बंद करण्याची मागणी केली.

वैद्यकीय कचरा प्रकल्पामध्ये यंत्राद्वारे कचरा जाळण्यात येतो. सदर प्रकल्पामुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे. याची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सदर प्रकल्प बंद करण्याकडे मनपा यंत्रणेने साफ दुर्लक्ष केले होते. त्यानंतर उपमहापौर मधुश्री पुजारी यांनीदेखील याबाबत अधिकाऱयांना कठोर सूचना केल्या होत्या. परंतु त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी मनपाच्या पथकातील अधिकाऱयांना धारेवर धरले.

यावेळी मनपा आरोग्याधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा आणि प्रदूषण नियंत्रण अधिकारी गोपालकृष्ण यांनी नागरिक प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Related posts: