|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » दक्षिण आफ्रिकेला 44 धावांची आघाडी

दक्षिण आफ्रिकेला 44 धावांची आघाडी 

वृत्तसंस्था /दरबान :

येथे सुरू असलेल्या लंकेविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरूवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेने चहापानावेळी लंकेला पहिल्या डावात 191 धावांत रोखून 44 धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या स्टीनने 4 गडी बाद केले. लंकेतर्फे कुशल परेराने अर्धशतक झळकविले.

या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 235 धावा जमविल्या होत्या. डि कॉकने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 80, बेहुमाने 7 चौकारांसह 47, कर्णधार डु प्लेसिसने 5 चौकारांसह 35 आणि किसन महाराजने 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. लंकेतर्फे टी. फर्नांडोने 62 धावांत 4 तर रजिताने 3 गडी बाद केले.

लंकेने 1 बाद 49 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. उपाहारापर्यंत लंकेची स्थिती 6 बाद 133 अशी केविलवाणी झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेची फलंदाजी कोलमडली. खेळाच्या पहिल्या सत्रात स्टीनने भेदक मारा करत फर्नांडो, करूणारत्ने यांना बाद केले. फर्नांडोने 2 चौकारांसह 19 धावा जमवित तो स्टीनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. फिलँडरने सलामीचा फलंदाज कर्णधार करूणारत्नेला पायचीत केले. त्याने 3 चौकारांसह 30 जमविल्या. फिलँडरने लंकेला आणखी एक धक्का देताना मेंडीसला 12 धावांवर झेलबाद केले. ऑलिव्हरने डिक्वेलाला 8 धावांवर झेलबाद केले. धनंजय डिसिल्वाने 41 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या पण उपाहारापूर्वी रेबाडाच्या गोलंदाजी तो झेलबाद झाला.

कुशल परेरा एकांकी लढत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 51 धावा जमविल्या. स्टीनने लकमलला 4 धावांवर झेलबाद केले. स्टीनने कुशल परेराला बदली खेळाडू हमझाकरवी झेलबाद करून आपल्या संघासमोरील महत्त्वाचा अडथळा दूर केला. रजिता 12 धांवावर धावचीत झाला. आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अंबुलडेनियाने 94 चेंडूत 4 चौकारांसह 24 धावा केल्याने लंकेला 191 धावांपर्यंत मजल मारता आली. लंकेचा डाव 59.2 षटकांत 191 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे स्टीनने 4 तर फिलँडर आणि रेबाडा यांनी प्रत्येकी दोन तसेच ऑलिव्हरने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका प.डाव- 59.4 षटकांत सर्वबाद 235, लंका प.डाव – 59.2 षटकांत सर्वबाद 191 ( के. परेरा 51, करूणारत्ने 30, अंबुलडेनिया 24, डिसिल्वा 23, बी. फर्नांडो 19, मेंडीस 12, रजिता 12, स्टीन 4/48, फिलँडर 2/32, रेबाडा 2/48, ऑलिव्हर 1/36). (धावफलक चहापानापर्यंत).

Related posts: