|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » रोखठोक प्रत्युत्तराचे लष्कराला स्वातंत्र्य

रोखठोक प्रत्युत्तराचे लष्कराला स्वातंत्र्य 

काळ, वेळ, जागा तुम्हीच ठरवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश : ‘सर्जिकल स्ट्राईक-2’चे संकेत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी वेळ, जागा आणि कारवाईचे स्वरुप कसे असेल हे सर्व ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्करासह सुरक्षा दलांना देण्यात येत असल्याची स्पष्टोक्ती शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. झाशी येथील जाहीर सभेत बोलताना याबाबत त्यांनी सुरक्षा यंत्रणांना स्पष्ट निर्देशच दिले. जवानांनी देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा मिळणारच, असे सांगत मोदींनी दुसऱया ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संकेत दिले. तसेच ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला

हिरवा झेंडा दाखविल्यानंतर आवेशपूर्ण भाषणात बोलताना त्यांनी पाकिस्तानसह दहशतवाद्यांवर टीकेची झोड उठविली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. देशातील जवानांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी घोडचूक केली आहे, आगामी काळात याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल असा इशारा देतानाच भारताला उद्ध्वस्त करण्याचे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला सर्वाधिकार देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 यावेळी ते म्हणाले, पुलवामातील हल्ल्यात प्राणार्पण केलेल्या जवानांचे शौर्य फार मोठे आहे. हल्ल्याच्या मागे जी विद्रोही शक्ती आहे, त्याचा लवकरच शोध घेतला जाईल. दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी देशातील 130 कोटी जनता सूडाच्या भावनेने पेटून उठली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दहशतवादाचा बिमोड करत राहणार

गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये संतापाची भावना आहे. संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. देशासाठी बलिदान केलेल्या जवानांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे, हे आमचे कर्तव्य आहे. यापुढील काळातही आम्ही दहशतवादाचा बिमोड करत राहणार असल्याचेही सांगत मोदी यांनी देशाची आक्रमक भूमिका विशद केली.

पाकिस्तान विनाशाच्या मार्गावर

पाकिस्तान सध्या विनाशाच्या मार्गावर चालत आहे. देशातील जवानांच्या कार्यावर आणि शौर्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. भारतामध्ये अस्थिरता आणण्याचे शत्रू राष्ट्राचे मनसुबे लवकरच धुळीस मिळतील. देशाची सुरक्षा आणि ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्नशील राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 पाकिस्तान मैत्रीच्या बुरख्याआडून जगभरात दहशतवाद पसरवत आहे. यासाठी सर्व देशवासियांनी एकसंध राहणे गरजेचे आहे. हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या कुटुंबांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. जे आमच्यावर टीका करतात त्यांच्याबाबत माझ्या मनात आदराची भावना आहे. मात्र, ही वेळ संवेदनशील आहे, राजकारण करण्याची नाही. आपल्या देशाचा सूर एकच आहे आणि तो संपूर्ण जगात ऐकू आला पाहिजे या दृष्टिने कार्यरत राहू, असेही ते बोलताना म्हणाले.

 हुतात्म्यांना श्रद्धांजली, दोन मिनिटांचे मौन

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवांनासाठी दोन मिनिटे मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारताच्या पाठिशी राहणाऱया मित्रराष्ट्रांचे आभार

सद्यस्थितीत दहशतवाद्यांचा निषेध करत भारताच्या खंबीरपणे पाठिशी राहणाऱयांचे पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले आहेत. जगातील सर्व देशांनी दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढा दिल्यास अशा प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा पाकिस्तानने गमावला

पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकला दणका

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. व्यापारासंदर्भात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. या बैठकीत पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा (सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्राचा) दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अरुण जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदींसह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) गॅट करारांतर्गत 1996 साली भारताकडून पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता. यानुसार, भारताला पाकिस्तान आणि जागतिक व्यापार संघटनेच्या अन्य सदस्य देशांना व्यापारात प्राधान्य देणे बंधनकारक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला सर्व स्तरावर एकटे पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून कठोर पावले उचलण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. दहशतवादाला पाठबळ देणाऱयांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही जेटली यांनी दिला.

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना कडक शब्दात समज

पुलवामातील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना कडक शब्दांत समज दिली आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता परराष्ट्र मंत्रालयात बोलावून ही समज दिली. यावेळी गोखले यांनी पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवरून महमूद यांची कानउघडणी केली. पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेला खतपाणी घालू नये तसेच या संघटनांना पाकिस्तानच्या भूमीवरून हालचाली करू देऊ नये, असेही परराष्ट्र सचिवांनी महमूद यांना सांगितले.

भारतीय राजदुतांना पाकमधून बोलावले माघारी

पुलवामा हल्ल्याची गंभीर दखल घेत भारताने पाकिस्तानमधील भारतीय राजदुतांनाही माघारी बोलावले आहे. ते भारतात दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर उच्चस्तरीय चर्चा करण्यात येणार आहे. तसेच उच्चस्तरीय पातळीवर दोन दिवसात घेण्यात आलेल्या निर्णयांची सविस्तर माहितीही त्यांना दिली जाणार आहे.

ना विसरणार, ना माफ करणार, बदला घेणारच : सीआरपीएफ

‘आम्ही ना विसरणार, ना माफ करणार. शहीद बंधूंना आमचा सलाम असून त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. या हल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल. वीरमरण आलेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार असा निर्धार केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केला आहे. सीआरपीएफने ट्विट करत आम्ही माफ करणार नाही अशी शपथच घेतली आहे.

हुतात्म्यांचा अंतिम आकडा चाळीस

तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जैश-एöमोहम्मदच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी पुलवामा जिल्हय़ात चढविलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यातील हुतात्म्यांच्या अधिकृत आकडय़ाविषयी शुक्रवारीही संभ्रमावस्था कायम होती. मात्र केंद्रीय राखीव पोलीस दलाने शुक्रवारी दुपारी 40 जवानांना वीरमरण आले असल्याचे स्पष्ट केले. तसेच 20 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.

 

Related posts: